इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरण- सीबीआयची अमित शाहना क्लीन चीट
By admin | Published: May 7, 2014 01:26 PM2014-05-07T13:26:55+5:302014-05-07T14:59:51+5:30
गुजरातमधील इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणी सीबीआयने नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय व भाजप नेते अमित शाह यांना क्लीन चीट दिली आहे.
Next
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ७ - गुजरातमधील इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणी सीबीआयने नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय व भाजप नेते अमित शाह यांना क्लीन चीट दिली आहे. याप्रकरणी अमित शाह यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करता येईल, असे कोणतेही पुरावे आपल्याकडे नसल्याचे सीबीआयने सांगितले. यामुळे अमित शाहना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान शाह यांच्याबरोबर गुजरातचे माजी पोलीस महासंचालक के. आर. कौशिक यांनाही सीबीआयने क्लिन चीट दिली आहे.
गुजरात पोलिसांनी २००४ साली मुंबईमध्ये शिकणा-या इशरत जहाँ या मुंबईच्या तरूणीचं एन्काऊंटर केले होते. त्यात इशरतसह अन्य चार जण ठार झाले होते. या चकमकीमध्ये ठार करण्यात आलेले सर्वजण लष्कर-ए-तैयबाचे अतिरेकी असल्याचा दावा केला होता.
या चकमकीमध्ये मारला गेलेला प्रणेश ऊर्फ जावेद शेख याच्या वडिलांनी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती. बुधवारी त्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सीबीआय अधिका-यांनी शहा व कौशिक यांच्याविरोधात पुरेसे पुरावे नसल्याने त्यांना क्लीनचीट देण्यात येत असल्याचे सांगितले.
या चकमकीप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत ११ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये निलंबित करण्यात आलेले अतिरिक्त पोलीस महासंचालक पी. पी. पांडे, डी. जी. वंजारा, जी. एल. सिंघल यांच्यासह 'आयबी'तील चार अधिका-यांचा समावेश आहे.