इशरत जहाँ चकमक; तीन पोलीस अधिकारी निर्दोष, विशेष सीबीआय न्यायालयाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 05:14 AM2021-04-01T05:14:16+5:302021-04-01T05:15:05+5:30
Ishrat Jahan Encounter : वर्ष २००४ मध्ये झालेल्या इशरत जहाँ कथित बनावट चकमक खटल्यात येथील विशेष केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) न्यायालयाने बुधवारी पोलीस अधिकारी जी. एल. सिंघल, तरुण बारोट आणि अनाजू चौधरी यांना बुधवारी निर्दोष मुक्त केले.
अहमदाबाद : वर्ष २००४ मध्ये झालेल्या इशरत जहाँ कथित बनावट चकमक खटल्यात येथील विशेष केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) न्यायालयाने बुधवारी पोलीस अधिकारी जी. एल. सिंघल, तरुण बारोट आणि अनाजू चौधरी यांना बुधवारी निर्दोष मुक्त केले. न्यायाधीश व्ही. आर. रावल यांनी सिंघल, बारोट (आता निवृत्त) आणि चौधरी यांची निर्दोष मुक्त करा, अशी मागणी केलेले अर्ज मंजूर केले. सीबीआयने मंजुरी आदेशाविरोधात ( सिंघल, बारोट आणि चौधरी यांच्यावर खटले चालवण्यास गुजरात सरकारने परवानगी नाकारली होती) निश्चित असा काहीही उल्लेख केला नाही त्यामुळे दिसते हे की, अर्जदार किंवा आरोपी हे त्यांचे अधिकृत कर्तव्य बजावत होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. सीबीआयने २० मार्च रोजी न्यायालयाला राज्य सरकारने या तीन आरोपींवर खटले चालवण्यास परवानगी नाकारली आहे, असे कळवले होते. न्यायालयाने ऑक्टोबर २०२० मधील आपल्या आदेशात असे निरीक्षण नोंदवले होते की, अधिकाऱ्यांनी त्यांचे कर्तव्य बजावले. त्यामुळे चौकशी करणाऱ्या यंत्रणेला त्यांच्यावरील खटल्यांसाठी परवानगी आवश्यक आहे.
सरकारी कर्मचाऱ्याने कर्तव्य बजावताना जे काही केले असेल त्यासाठी त्याच्यावर खटला चालवायचा असल्यास भारतीय दंड संहितेचे कलम १९७ अनुसार सरकारची मंजुरी लागते.
इशरत जहाँ (१९) ही मुंबई जवळच्या मुंब्रा येथील तरुणी जावेद शेख ऊर्फ प्राणेश पिल्लई, अमजदअली अकबरअली राणा आणि झिशान जोहर यांच्यासोबत गुजरात पोलिसांशी १५ जून, २००४ रोजी अहमदाबादजवळ झालेल्या चकमकीत मारली गेली होती. मारले गेलेले चारही जण हे दहशतवादी होते व ते गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची योजना तयार करत होते, असा दावा गुजरात पोलिसांनी केला होता.
तथापि, उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) ती चकमक बनावट होती, असा निष्कर्ष काढल्यानंतर सीबीआयने वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता.