इशरत; कारवाई रद्द करण्याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी
By admin | Published: March 2, 2016 02:36 AM2016-03-02T02:36:42+5:302016-03-02T02:36:42+5:30
२००४ मधील इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी गुजरात पोलिसांविरुद्ध करण्यात आलेली फौजदारी कार्यवाही, निलंबन आणि अन्य कारवाई रद्द करण्याची मागणी
नवी दिल्ली : २००४ मधील इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी गुजरात पोलिसांविरुद्ध करण्यात आलेली फौजदारी कार्यवाही, निलंबन आणि अन्य कारवाई रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविली आहे. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेव्हिड हेडली याने नुकत्याच दिलेल्या कबुलीजबाबाच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची सदस्य होती, असे हेडलीने मुंबई न्यायालयाला सांगितले होते. ‘ही याचिका सुनावणीसाठी दाखल करण्यात येत आहे,’ असे सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर आणि न्या. यू. यू. ललित यांच्या पीठाने म्हटले आहे. या याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्याची विनंती वकील शर्मा यांनी केली होती. इशरत जहाँला एका चकमकीत ठार मारण्यात आले होते. याप्रकरणी तत्कालीन डीआयजी डी.जी. वंजारासह गुजरातच्या काही पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबईच्या न्यायालयात खटला सुरू आहे.
(वृत्तसंस्था)