Lokmat Parliamentary Awards: हिंदू बहुसंख्य तरच ईश्वर-अल्ला तेरो नाम शक्य: डॉ. सुधांशू त्रिवेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2023 10:35 AM2023-03-18T10:35:59+5:302023-03-18T10:36:38+5:30
‘लोकमत कॉन्क्लेव्ह’मध्ये न्यूज-१८ चे व्यवस्थापकीय संपादक किशोर अजवानी यांनी त्रिवेदी यांच्याशी संवाद साधला.
जगातील सर्व प्रमुख धर्म एकत्र नांदताहेत असा भारताशिवाय दुसरा देश नाही. हिंदू बहुसंख्य असतील तर ईश्वर-अल्ला तेरो नाम शक्य आहे. असे उदाहरण जगात दुसरे नाही. परंतु, काँग्रेसने या देशाला अंशत: मुस्लीम राष्ट्र बनवले होते. आम्ही फक्त सर्व धर्म एका पातळीवर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते, राज्यसभेचे सदस्य डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी हिंदू राष्ट्राच्या मुद्यावर काँग्रेसवर हल्ला चढविला.
‘लोकमत कॉन्क्लेव्ह’मध्ये न्यूज-१८ चे व्यवस्थापकीय संपादक किशोर अजवानी यांनी त्रिवेदी यांच्याशी संवाद साधला. काँग्रेसवर दुटप्प्पीपणाचा आरोप करताना त्रिवेदी म्हणाले की, महात्मा गांधी यांनी अखेरच्या क्षणी ‘हे राम’ शब्द उच्चारले. पण, काँग्रेसने बाबरी मशीद प्रकरणात कोर्टात प्रतिज्ञापत्रावर सांगितले की, प्रभू श्रीराम अस्तित्वातच नव्हते. असे बोलून काँग्रेस महात्मा गांधींची वारंवार हत्या करीत नाही का? ईश्वर-अल्ला तेरो नाम, केवळ हिंदूच म्हणतात, मुस्लीम नाही. आम्ही हिंदू व्हा, असे कुणालाही म्हणत नाही. संसदेत बोलू देत नाही, हे राहुल गांधींचे म्हणणे अर्धसत्य आहे. संसदेचे अधिवेशन सुरू होण्याच्या तीन ते चार दिवस आधी विदेशी वृत्तपत्रात सरकारविरुद्ध छापले जाते आणि त्यावर संसदेत गदारोळ होतो. हे सर्व ठरवून केले जाते. ‘तिकडून सूर आणि इकडून ताल’, असाच काहीसा प्रकार असल्याचा आरोप त्रिवेदी यांनी केला.
आम्ही सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही. काही राज्यांमध्ये जास्त जागा असूनही मुख्यमंत्री पद मित्रपक्षाला दिले. देश जसजसा साक्षर होत गेला तसा भाजप सत्तेवर आला. भाजपवर आरोप करणाऱ्यांनी काय चांगले होईल, ते बघावे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"