कानपूर रेल्वे अपघात प्रकरणी ISI एजंटला अटक
By admin | Published: February 7, 2017 10:52 AM2017-02-07T10:52:36+5:302017-02-07T11:07:12+5:30
कानपूर तसंच इतर रेल्वे अपघातांमध्ये संशयित असलेल्या पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसएचा एजंट शमशूल हुडा याला दुबईहून नेपाळला आणण्यात आलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - कानपूर तसंच इतर रेल्वे अपघातांमध्ये संशयित असलेल्या पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसएचा एजंट शमशूल हुडा याला दुबईहून नेपाळला आणण्यात आलं आहे. बिहार पोलिसांनी केलेल्या तपासात हुडाशी संबंधित आरोपींनी कानपूर रेल्वे अपघाताचा कट रचला गेला होता याची कबुली दिली होती. आयएसए एजंट शमशूल हुडा नेपाळी नागरिक आहे. मंगळवारी नेपाळमध्ये तो पोहोचला असता अटकेची कारवाई करण्यात आली. एनआयए, रॉ आणि गुप्ततर यंत्रणेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित असून त्याची चौकशी करण्याची शक्यता आहे.
कानपूरजवळ झालेल्या रेल्वे अपघातात एकूण 150 प्रवाशांनी आपला जीव गमावला होता, तर 200 हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. मोतिहारी आणि नेपाळमध्ये सहा जणांना अटक केल्यानंतर हुडासंबंधी माहिती मिळाली होती. हुडा नेपाळमधूनच आपलं नेटवर्क चालवत होता. बृज किशोर गिरी उर्फ बाबा गिरी, शंभू गिरी आणि मुजाहिर अन्सारी यांच्यामार्फेत तो आपलं नेटवर्क चालवत होता. या तिघांनाही नेपाळमध्ये अटक करण्यात आली आहे.
बृज किशोर गिरीने बिहारमधील तीन आरोपी उमाशंकर पटेल, मोतीलाल पासवान आणि मुकेश यादव यांनी तीन लाख रुपये दिले होते. इंदोर - पाटणा एक्स्प्रेस आणि सियालदह-अजमेर एक्स्प्रेसला टार्गेट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. बिहारमधील या तिन्ही आरोपींनी नेपाळमधील एका आयएसआय एजंटसाठी आपण काम केल्याचं कबुल केलं होतं. हुडा हा बृजचा हँण्डलर होता असा पोलिसांचा दावा आहे.