दिल्ली-मुंबई हादरवणारा ‘प्लॅन D’ चा खुलासा; खवळलेल्या दाऊदनं घेतलीय पाकच्या ISI ची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 11:27 AM2021-09-15T11:27:30+5:302021-09-15T11:30:21+5:30
भारतात दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी पाकिस्तानकडून मोठं षडयंत्र रचलं गेलं होते. परंतु वेळीच दिल्ली पोलीस आणि यूपी एटीएसने पाकिस्तानी षडयंत्राचा भांडाफोड केला
नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केलेल्या ६ दहशतवाद्यांपैकी चौघांना रात्रीच कोर्टात हजर केले. कोर्टाने या चौघांना १४ दिवसांच्या पोलीस कस्टडीत पाठवलं आहे. जान मोहम्मद शेख, ओसामा, मूलचंद आणि मोहम्मद अबू बकर अशी चौघांची नावं आहेत. तर इतर दोन दहशतवाद्यांना दिल्ली पोलीस आज दुपारी कोर्टात हजर करणार आहेत.
पाकचं नापाक षडयंत्र
भारतात दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी पाकिस्तानकडून मोठं षडयंत्र रचलं गेलं होते. परंतु वेळीच दिल्ली पोलीस आणि यूपी एटीएसने पाकिस्तानी षडयंत्राचा भांडाफोड केला. दहशतवाद्यांना उघड करून देशात मोठा अनर्थ टळला आहे. जान मोहम्मद शेख हा महाराष्ट्रात राहणारा आहे. तर २२ वर्षीय ओसामा हा जामियानगर दिल्लीत राहणारा आहे. ४७ वर्षीय मूलचंद एलियस लाल रायबरेली, यूपी तर २८ वर्षीय जीशान कमर प्रयागराज येथे राहायला होता. पाचवा संशयित अबु बकर मोहम्मद उत्तर प्रदेशच्या बहराइच जिल्ह्यात राहणारा आहे. मागील काही दिवसांपासून हे दिल्लीत होते. तर मोहम्मद आमिर जावेद हा लखनौ येथे वास्तव्यास होता. हे ६ दहशतवादी देशात हल्ला घडवण्याच्या प्लॅनिंगमध्ये होते परंतु त्यांचं षडयंत्र अयशस्वी झालं. आता हे सगळे पोलिसांच्या ताब्यात आहेत. दहशतवाद्यांच्या आडून पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI आणि डी कंपनीचा हात असल्याचं समोर येत आहे.
दिल्ली-मुंबई हादरवणारा ‘प्लॅन D’
मंगळवारी दिल्ली पोलिसांनी या सहा दहशतवाद्यांना अटक केली. हे सहाही जण देशातील विविध भागांत स्फोट घडवण्याचं प्लॅनिंग करत होते. महाराष्ट्रातील दहशतवाद्याला राजस्थानमधून अटक केली. तर दोन दहशतवाद्यांना दिल्लीत पकडलं. ३ दहशतवादी यूपीतून अटक केले. त्यामुळे देशातील केवळ एका राज्यात नाही तर महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, यूपीपर्यंत दहशतवादी पसरले होते. या दहशतवाद्यांकडून २ IED जप्त करण्यात आले आहेत. ज्यात १ किलो RDX चा वापर करण्यात आला आहे. त्याशिवाय २ हँड ग्रेनेडही सापडले आहेत.
पाकिस्तानात मिळालं ट्रेनिंग
अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी जीशान कमर आणि ओसामा यांना पाकिस्तानात दहशतवादाचं ट्रेनिंग घेतलं आहे. या दहशतवाद्याच्या माध्यमातून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारतात पुन्हा एकदा हल्ला घडवण्याचं षडयंत्र रचत होता. मिळालेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम पाकिस्तानात लपून बसला आहे. तोच या सगळ्या प्लॅनिंगचा मास्टरमाईंड आहे. अनीस इब्राहिम अंडरवर्ल्डच्या माध्यमातून दहशतवादी मॉड्यूलला सपोर्ट करत आहे. अनीस दहशतवाद्यांना पैसे पुरवतो त्याचसह सीमेपलीकडे हत्यारं आणि स्फोटक पदार्थ नेआण करण्यासाठीही मदत करतो.
१९९३ च्या बॉम्बस्फोटासारखा कट
दिल्ली पोलीस अधिकारी नीरज ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे, दहशतवाद्यांच्या या टीमचं काम सीमेपलीकडून हत्यारं आणून त्याला देशातील विविध राज्यात पोहचवण्याचं होतं. अनीस इब्राहिम हा दाऊद इब्राहिमसारखा १९९३ च्या बॉम्बस्फोटाप्रमाणे कट रचण्याचा प्रयत्नात होता. पाकिस्तानात लपून बसलेल्या दाऊन इब्राहिमविरुद्ध मागील काही वर्षात कठोर कारवाई करण्यात येत आहे. देशात डी कंपनीच्या संपत्तीचा लिलाव केला जात आहे. त्यामुळे दाऊद इब्राहिम खवळला आहे. त्यामुळे आपली ताकद दाखवण्यासाठी ISI सोबत मिळून भारताविरुद्ध षडयंत्र रचण्यासाठी प्लॅनिंग करत आहे. दिल्ली पोलीस आणि यूपी एटीएसनं हे षडयंत्र उधळून लावलं आहे.