इस्लामिक स्टेटमध्ये २३ भारतीय तरूण सामील, त्यापैकी ६ जण ठार
By admin | Published: November 23, 2015 06:35 PM2015-11-23T18:35:49+5:302015-11-23T18:36:18+5:30
गेल्या दोन वर्षांमध्ये २३ भारतीय इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झाले असून त्यातले सहा जण मारले गेल्याचे वृत्त गुप्तचर खात्याच्या सूत्रांच्या हवाल्याने सीएनएन आयबीएनने दिले
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - गेल्या दोन वर्षांमध्ये २३ भारतीय इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झाले असून त्यातले सहा जण मारले गेल्याचे वृत्त गुप्तचर खात्याच्या सूत्रांच्या हवाल्याने सीएनएन आयबीएनने दिले आहे.
इस्लामिक स्टेटचे पाठिराखे सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातल्या माथेफिरू मुस्लीमांना आकर्षित करत असल्याचे गेल्या काही वर्षांमध्ये दिसून आले आहे. कल्याणचा एक तरूण इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी सीरियाला गेल्याचे समजल्यावर भारतामध्येही ही लागण झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सोशल मीडियावर पाळत ठेवण्याचे तसेच वाट भरकटत असलेल्या मुस्लीम तरूणांना दहशतवादी विचारांपासून परावृत्त करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, या दरम्यान २३ भारतीय इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी राजवटीत सामील होण्यासाठी सीरियाला रवाना झाल्याचे गुप्तचर खात्याच्या सूत्रांच्या हवाल्याने सीएनएन आयबीएनने दिले आहे. या २३ जणांपैकी सहा जण लढताना ठार झाल्याचेही सांगण्यात आले आहे.
जे सहा तरूण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे त्यांची नावे आतिफ मोहम्मद, मौलाना अब्दुल कादीर, फैज मसूद, सहीम तन्वी, मोहम्मद साबीर, मोहम्मद उमर सुबाहन अशी आहेत. यातले काहीजण कर्नाटक व उत्तरप्रदेशमधील असल्याचे समजते.