“गाझापट्टीतील संघर्ष सोडवण्यासाठी भारताने हस्तक्षेप करायला हवा”; पॅलेस्टाइनचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 10:57 PM2023-10-10T22:57:10+5:302023-10-10T23:02:46+5:30

Israel Hamas Conflict: इस्रायलच्या धोरणांमुळे हा संघर्ष दिसत असून, याला आंतरराष्ट्रीय समुदाय जबाबदार असल्याची टीका करण्यात आली आहे.

israel hamas palestine conflict palestine ambassador in india said india is a friend to both and must step into resolve current crisis | “गाझापट्टीतील संघर्ष सोडवण्यासाठी भारताने हस्तक्षेप करायला हवा”; पॅलेस्टाइनचे आवाहन

“गाझापट्टीतील संघर्ष सोडवण्यासाठी भारताने हस्तक्षेप करायला हवा”; पॅलेस्टाइनचे आवाहन

Israel Hamas Conflict: गाझापट्टीत हमास आणि इस्रायल यांच्यात प्रचंड संघर्ष पाहायला मिळत आहे. या संघर्षात अनेक देशांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे. गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. इस्राइली सैन्याने हमासचे ४७५ रॉकेट सिस्टिम आणि ७३ कमांड सेंटर उद्ध्वस्त केले आहेत. तसेच इस्राइलच्या हद्दीत घुसलेल्या हमासच्या १५०० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असून, त्यांचे मृतदेह इतरत्र पडले आहेत, असा दावा इस्राइलमधील स्थानिक माध्यमांनी केला आहे. या प्रचंड संघर्षात आता पॅलेस्टाइनकडूनभारताला महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. 

भारत इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांचाही मित्र देश आहे आणि गाझा पट्टीतील सध्याचे संकट सोडवण्यासाठी भारताने हस्तक्षेप केला पाहिजे, असे पॅलेस्टाईनचे भारतातील राजदूत अबू अलहैजा यांनी म्हटले आहे. हमासचा इस्रायवरील हल्ला हा दहशतवादी हल्ला असल्याचे भारताने म्हटले आहे. तसेच हमासच्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर अबू अलहैजा यांनी केलेले विधान महत्त्वाचे मानले जात आहे. 

या युद्धाला आंतरराष्ट्रीय समुदाय जबाबदार

राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या सरकारने नियुक्त केलेले पॅलेस्टाईनचे भारतातील राजदूत अबू अलहैजा यांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, जे काही सुरू आहे, ती इस्रायलच्या धोरणांवरील प्रतिक्रिया आहे. या युद्धाला आंतरराष्ट्रीय समुदाय जबाबदार आहे. युनायटेड नेशन्सने पॅलेस्टाईनच्या संदर्भात ८०० ठराव पारित केले. मात्र, इस्रायलने एकही ठराव मान्य केला नाही. इस्रायलने पॅलेस्टाईनच्या जमिनीवरील नियंत्रण काढले तर हल्लेही थांबतील, असे अलहैजा यांनी म्हटले आहे.

भारताने यात हस्तक्षेप करून चर्चेसाठी मदत करावी 

पॅलेस्टाईन सामान्य नागरिकांच्या हत्येच्या विरोधात आहे आणि आम्हाला या संकटावर शांततापूर्ण तोडगा हवा आहे. आमचे राष्ट्राध्यक्ष याबाबत अनेक युरोपीय देशांच्या संपर्कात आहेत. भारत हा इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांचा मित्र आहे. अशा परिस्थितीत भारताने यात हस्तक्षेप करून चर्चेसाठी मदत करावी, अशी आमची इच्छा आहे, असे अबू अलहैजा यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, इस्रायल हा एकमेव देश आहे जो कधीही आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करत नाही. सन १९९३ मध्ये आमचा करार झाला होता, आम्हाला आशा होती की, आम्ही स्वतंत्र होऊ आणि इस्रायलसोबत शेजारी देश आणि भाऊ म्हणून राहू. पण हे होऊ शकले नाही. पॅलेस्टाईनला कोणतेही अधिकार दिले गेले नाहीत. गाझापट्टी आणि वेस्ट बँकमध्ये आम्ही ६ दशलक्ष लोक राहतो. आम्हाला शांतता हवी आहे. आमच्या मुलांनी इतर मुलांप्रमाणे खेळावे अशी आमची इच्छा आहे. त्यांना मारले जाऊ नये, असे अबू अलहैजा यांनी यापूर्वी म्हटले होते. 
 

Web Title: israel hamas palestine conflict palestine ambassador in india said india is a friend to both and must step into resolve current crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.