"ही कुजलेली मानसिकता...", शरद पवारांच्या 'या' भूमिकेवर पीयूष गोयल संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 09:02 PM2023-10-18T21:02:36+5:302023-10-18T21:03:48+5:30
शरद पवारांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका मांडल्यामुळे भाजपकडून शरद पवारांवर टीका सुरू झाली आहे. यावरून केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचले आहे. हमास आणि इस्रायलमधील युद्ध १२ व्या दिवशीही सुरू आहे. दरम्यान, या युद्धात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल पाठिंबा दर्शविला आहे. नरेंद्र मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर बोलून भारत इस्रायलच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे, असा संदेश दिला आहे. परंतु, देशातील काही संघटना आणि पक्षांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका मांडली आहे. दरम्यान, शरद पवारांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका मांडल्यामुळे भाजपकडून शरद पवारांवर टीका सुरू झाली आहे. यावरून केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
पीयूष गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याबाबत भारताच्या भूमिकेबाबत बेजबाबदार वक्तव्ये करतात, हे अतिशय अस्वस्थ करणारे आहे, असे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. तसेच, जगाच्या कोणत्याही भागात असलेल्या दहशतवादाच्या धोक्याचा सर्व प्रकारांनी निषेध केला पाहिजे. देशाचे संरक्षणमंत्री आणि अनेकवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीचा (शरद पवार) दहशतवादाशी निगडित विषयात असा बेजबाबदार दृष्टिकोन आहे, ही खेदाची गोष्ट आहे. शरद पवार हे बाटला हाऊस चकमकीत अश्रू ढाळणाऱ्या सरकारचा भाग होते. भारतीय भूमीवरील हल्ल्याच्या वेळी झोपून राहिले. ही कुजलेली मानसिकता थांबवायला हवी. मला आशा आहे की शरद पवार आता तरी देशाचा विचार करतील, असेही पीयूष गोयल म्हणाले.
It is very disturbing when a senior leader like @PawarSpeaks ji makes preposterous statements on India’s stand on a terror attack in Israel. The menace of terrorism has to be condemned in all forms, in any part of the world. It is a pity that a person who has been India’s Defence…
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 18, 2023
पीयूष गोयल यांच्या ट्विटनंतर शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पीयूष गोयल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, "त्यांनी (पीयूष गोयल) पहिल्यांदा पॅलेस्टाईनबाबत देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे विधान पाहावे. मला वाटते की त्यांचे सरकार (केंद्र सरकार) काय निर्णय घेत आहे. ते त्यांना समजेल." दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांना म्हणाले, ज्या भागात युद्ध सुरू आहे ती जमीन ही पॅलेस्टिनी लोकांची आहे. तिथं अतिक्रमण झालं आणि इस्रायल देश उदयाला आला. मला त्याच्या खोलात जायचं नाही. परंतु, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपासून, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी या सर्वांची पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका होती. दुर्दैवाने आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी (नरेंद्र मोदी) इस्रायलची बाजू घेतली आहे. ते करत असताना त्या जमिनीचे मूळ मालक असलेल्या पॅलेस्टाईनकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे. त्यांची भूमिका काहीही असो, परंतु, आपली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्वच्छ असली पाहिजे.