इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 08:42 AM2024-10-07T08:42:28+5:302024-10-07T08:42:44+5:30
इस्रायल-इराण हे भीषण युद्धाच्या छायेत आहेत. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे.
इस्रायलवर मोठे संकट कोसळण्याचे संकेत दिसू लागले आहेत. हमास-गाझा, हिजबुल्लाह यांच्याशी संघर्ष करताना आता इराणशीही दोन हात करावे लागणार असल्याचे चित्र आहे. हे युद्ध जर भडकले तर एकेक देश या युद्धात सहभागी होतील आणि त्याचा मोठा फटका जगाला बसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. भारतात पर्यटनासाठी आलेले किंवा येणार असलेले इस्रायली लोक बुकिंग अचानक रद्द करू लागले आहेत. भारतात आलेले इस्रायली नागरिक पुन्हा मायदेशात जाण्यासाठी धडपड करू लागले आहेत.
इस्रायल-इराण हे भीषण युद्धाच्या छायेत आहेत. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. तोवर इस्रायलने लेबनानमध्ये तळ असलेल्या हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा बिमोड करण्यास सुरुवात केली आहे. अशातच हिजबुल्लाहचा प्रमुख मारला गेल्याने इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली आहेत. याला इस्रायलने अद्याप प्रत्यूत्तर दिलेले नसून याची तयारी करत असल्याचे वृत्त येत आहे.
भारतातून अमेरिका किंवा युरोपला जाण्यासाठी थेट विमाने आहेत. परंतू, पश्चिम आशियातील तनावामुळे ही विमाने रशियामार्गे जात आहेत. हा मार्ग दूरचा असल्याने खर्चही वाढला आहे. नोव्हेंबरमध्ये आग्रा फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी आगाऊ आरक्षण केलेले होते. ते आता रद्द करण्यास सुरुवात झाली आहे.
आग्र्यामध्ये ऑक्टोबर ते मार्च हा पर्यटनाचा हंगाम आहे. या काळात लाखो परदेशी पर्यटक येत असतात. हॉटेल फुल असतात, विमाने देखील फुल असतात. परंतू, परिस्थिती अशी बनली आहे की या लोकांनी बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायली आणि इराणी पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. अमेरिकेत निवडणूक असल्याने ते देखील आलेले नाहीत असे आग्रा टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप अरोरा यांनी म्हटले आहे.
हिमाचल प्रदेशात पर्यटनासाठी आलेले इस्रायली नागरिक आपल्या देशात परतू लागले आहेत. हिमाचलमधील मॅक्लॉडगंज आणि कुल्लू जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांना दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. यावर्षी इस्रायलमधून कमी पर्यटक आले होते. ते देखील आपल्या देशात सर्व प्लॅन रद्द करून परतू लागले आहेत.