मोदींच्या दौऱ्यासाठी इस्रायलच्या पायघड्या
By admin | Published: July 4, 2017 06:10 AM2017-07-04T06:10:08+5:302017-07-04T06:10:08+5:30
मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी इस्रायलने लाल पायघड्या अंथरल्या असून, मोदींचे पाय तेल अवीवच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी इस्रायलने लाल पायघड्या अंथरल्या असून, मोदींचे पाय तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळाला लागण्यापूर्वीच, मध्य-पूर्वेतील या देशाने या भेटीला ‘यशस्वी व ऐतिहासिक’ असे संबोधले आहे.
यातील यशाचा भाग तीन दिवसांचा दौरा संपल्यानंतर स्पष्ट होईल, परंतु हा दौरा ऐतिहासिक आहे, हे मात्र नक्की. ७० वर्षांपूर्वी साधारणत: एकाच वेळी नवराष्ट्र म्हणून उदयास आलेल्या या दोन देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित होऊन २५ वर्षे होत आहेत. त्याचे औचित्य साधून हा दौरा आखण्यात आला असून, कोणाही भारतीय पंतप्रधानांचा पहिला इस्रायल दौरा म्हणून त्यास आगळे महत्त्व आहे.
दोन्ही देशांमध्ये दौऱ्याच्या पूर्वसंध्येस कमालीचे औत्सुक्य व मैत्रीभाव दिसून आला. भारताकडून मोदी व इस्रायलकडून बेंजामिन नेत्यानाहू या दोन्ही पंतप्रधानांनी समाजमाध्यमांतून या भावना व्यक्त केल्या आणि या भेटीने द्विपक्षीय संबंध अधिक बळकट आणि बहुआयामी होतील, असा विश्वास व्यक्त केला. नेत्यानाहू यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘माझे मित्र नरेंद्र मोदी उद्या येत आहेत
व ते जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान असल्याने, त्यासाजेचे आदरातिथ्य करण्यासाठी मी स्वत: त्यांच्या अनेक कार्यक्रमांना हजर राहणार आहे.’
बरेच काही शिकण्यासारखे
माझा इस्रायल दौरा अनेक क्षेत्रांमध्ये असलेले द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करेल व दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये अधिक जवळीक निर्माण करेल. जगाने इस्रायलकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान