आदित्य एल १ ची अचूक कामगिरी; सौरज्वाळेची केली प्रथमच नोंद, ISRO ला मोठे यश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 10:14 AM2023-11-08T10:14:39+5:302023-11-08T10:17:56+5:30
ISRO Aditya L1 Mission: आदित्य एल १च्या नोंदी ‘नासा’च्या उपग्रहापेक्षा अधिक अचूकतेने एक्सरेचे प्रमाण दाखवत असल्याचे दिसून आले आहे.
ISRO Aditya L1 Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल १ चे यशस्वी प्रक्षेपण केले. यानंतर आता आदित्य एल १ ने अचूक कामगिरी केली आहे. आदित्य एल १ ने सौरज्वाळेची नोंद केली आहे. आदित्य एल १च्या नोंदी ‘नासा’च्या उपग्रहापेक्षा अधिक अचूकतेने एक्सरेचे प्रमाण दाखवत असल्याचे दिसून आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या आदित्य एल १ यानावरील हाय एनर्जी एल १ ऑर्बिटिंग एक्सरे स्पेक्ट्रोमीटर या उपकरणाने सौरज्वाळांची प्रथमच नोंद केली. इस्रोने याबाबतची माहिती जाहीर केली. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडल्यानंतर आदित्य एल १ यानाचा लॅग्रेंज पॉईंट १ (एल १) च्या दिशेने सध्या प्रवास सुरू आहे. सूर्याच्या दिशेने पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर असलेल्या एल १ या ठिकाणी पोहोचण्याआधी यानावरील विविध उपकरणांच्या चाचण्या घेण्यात येत आहेत.
सौरज्वाळांमधून निघणाऱ्या उच्च ऊर्जेच्या एक्सरेच्या नोंदी घेणार
स्रोने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य एल १वरील एचईएल१ओएस हे उपकरण सुरू करण्यात आले. हे उपकरण सौरज्वाळांमधून निघणाऱ्या उच्च ऊर्जेच्या एक्सरेच्या नोंदी घेणार आहे. एचईएल१ओएस या उपकरणाने सूर्यावरून उसळलेल्या सी ६ या उच्च श्रेणीच्या ज्वाळेची नोंद घेतली. आदित्य एल १ वरील एचईएल १ ओएस उपकरणाने घेतलेल्या नोंदी आणि नासाच्या उपग्रहाने घेतलेल्या नोंदी तंतोतंत जुळल्या आहे, असे सांगितले जात आहे. एचईएल१ओएस हे उपकरण ‘इस्रो’च्या यूआर राव सॅटेलाइट सेंटरने विकसित केले आहे.
दरम्यान, इस्रो संस्थेने आता नव्या मिशनवर काम सुरू केले आहे. चंद्र, सूर्यानंतर ISRO आता मंगळ ग्रहाची रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ISRO ने तयारी सुरु केली आहे. २०२४ मध्ये इस्रो मंगळयान-२ मिशन लॉन्च करणार आहे. NASA ला ज्यामध्ये यश मिळालेले नाही, ती रहस्य उलगडण्याचा इस्रो प्रयत्न करणार आहे. मात्र, तत्पूर्वी इस्रोचे सर्व लक्ष मिशन गगनयानवर आहे. भारताची ही पहिली मानवी अवकाश मोहीम आहे.