इस्रोने रचला इतिहास
By admin | Published: June 23, 2016 05:25 AM2016-06-23T05:25:39+5:302016-06-23T05:25:39+5:30
भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) येथील सतीश धवन अंतराळ तळावरून एकाच अग्निबाणाने एकाच वेळी तब्बल २० उपग्रहांचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करून बुधवारी नवा इतिहास रचला.
श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) येथील सतीश धवन अंतराळ तळावरून एकाच अग्निबाणाने एकाच वेळी तब्बल २० उपग्रहांचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करून बुधवारी नवा इतिहास रचला. या उपग्रहांमध्ये ‘इस्रो’चा स्वत:चा ‘कार्टोस्टॅट-२’ या मालिकेतील उपग्रह व चेन्नई येथील सत्यभागा विद्यापीठाचा ‘सत्यभामा सॅट’ व पुणे येथील कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगचा ‘स्वयम’ हे तीन उपग्रह भारतीय होते. इतर १७ उपग्रह विदेशी सरकारे किंवा खासगी संस्थांचे होते व त्यांचे प्रक्षेपण व्यापारी तत्त्वावर करण्यात आले.
‘इस्रो’च्या अत्यंत विश्वासार्ह व ‘वर्कहॉर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएसएलव्ही-सी ३४ या अग्निबाणाने त्याच्या सलग ३५ व्या सफल उड्डाणात ही गौरवास्पद कामगिरी फत्ते केली. हवाई तळाच्या दुसऱ्या लॉन्चपॅडवरून हा अग्निबाण ठरल्या कार्यक्रमानुसार बुधवारी सकाळी ९.२६ या अचूक वेळेला झेपावला अवघ्या २६ मिनिटांत त्याने सर्व २० उपग्रह पृथ्वीपासून ५०३ किमी अंतरावर ठरल्या क्रमाने व ठरल्या अंतरांवर ‘सन सिंक्रोनस आॅर्बिट’ म्हणजे सूर्याच्या स्थितिक कक्षेत स्थापित केले.
४४.४ मीटर उंचीचा पीएसएलव्ही अग्निबाण स्वत:च्या ३२० टन वजनाखेरीज सर्व उपग्रहांचा मिळून आणखी १,२८८ किलोचा भार घेऊन झेपावला. यापैकी ‘कार्टोस्टॅट-२’ उपग्रह सर्वाधिक म्हणजे ७२५.५ किलो वजनाचा होता. अनुक्रमे दीड व एक किलो वजनाचे ‘सत्यभामास्टॅट’ व ‘स्वयम’ हे शैक्षणिक उपग्रह सर्वात कमी वजनाचे होते. ‘कार्टोस्टॅट’ उपग्रह नियमितपणे रिमोट सेंसिंग सेवा प्रदान करेल आणि त्याने पाठविलेल्या छायाचित्रांचा बहुउद्देशीय उपयोग होऊ शकेल. या उपग्रहावर पॅनक्रोमेटिक आणि मल्टिस्पेक्ट्रल कॅमेरे बसविलेले आहेत. अग्निबाणापासून विलग होताच त्याचे दोन्ही सौरबाहू आपोआप उघडले गेले आणि बंगळुरु येथील इस्रोच्या भूनियंत्रण केंद्राने लगेच त्याचे पुढील संचालन सुरु केले. येत्या काही दिवसांत कक्षा व कल अचूकपणे ठाकठिक केला गेल्यावर तो प्रत्यक्ष काम सुरु करेल. ‘सत्यभामास्टॅट’ व ‘स्वयंम’ हे विद्यार्थ्यांनी तयार केलेले उपग्रह असून त्यांचा उपयोग अनुक्रमे शैक्षणिक प्रसारण व ‘हॅम’ रेडिओ यांच्यासाठी केला जाईल.
या तीन स्वदेशी उपग्रहांखेरीज जे अन्य १७ उपग्रह सोडण्यात आले त्यांत अमेरिकेचे १२ अर्थ इमेजिंग ‘डव’ उपग्रह आणि अन्य एका अमेरिकन उपग्रहाचाही समावेश आहे. उर्वरित दोन उपग्रह कॅनडाचे तर प्रत्येकी एक उपग्रह जर्मनी व इंडोनेशियाचा आहे.
इस्रोने याआधी पीएसएलव्हीच्या मदतीने २८ एप्रिल २००८ रोजी १० उपग्रह एकाच वेळी सोडले होते तर अमेरिकेच्या मिनोटॉर-१ या अग्निबाणाने २९ उपग्रह एकाच वेळी सोडले होते. रशियाच्या डीएनईपीआर अग्निबाणाने एकाच वेळी ३३ उपग्रह सोडले होते.
नकाशे आणि भूसर्वेक्षण
‘कार्टोसॅट-२ चा वापर मानचित्रण (कार्टोग्राफी), शहरी व ग्रामीण अप्लिकेश्न, तटवर्ती भूमी उपयोग आणि नियमन, रस्ते नेटवर्कची निगराणी आणि जल वितरणसारख्या सुविधांच्या व्यवस्थापनासाठी केला जाईल. आता भारताजवळ ११ भू-सर्वेक्षण उपग्रह परिचालन स्थितीत आहेत. त्यात रिसोर्ससॅट-१ आणि २, कार्टोसॅट-१, २, २ए, २बी, रिसॅट-१ आणि २, ओसनसॅट-२ यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
आणखी कौशल्याची तयारीइस्रोने बुधवारी सोडलेले सर्व उपग्रह एकाच कक्षेत
परंतु निरनिराळ््या अंतरावर सोडले. अग्निबाणाच्या एकाच उड्डाणात अनेक उपग्रह निरनिराळ््या कक्षांमध्ये सोडण्यासाठी तंत्रज्ञान आणखी प्रगत करून त्यावर हुकूमत मिळविणे गरजचे आहे. इस्रोने बुधवारच्या उड्डाणात त्यासाठी दोन प्रयोगही केले. अग्निबाणाच्या चौथ्या टप्प्याच्या ज्वलनात सर्व उपग्रह सोडून झाल्यावर त्याचे इंजिन पाच सेकांदांसाठी पुन्हा सुरू केले गेले. ५० मिनिटे बंद ठेवून ते पुन्हा पाच सेकंद सुरू केले गेले. पुढच्या उड्डाणात या तंत्राचा वापर करून इस्रो हवामान अंदाज आणि चक्रीवादळांचा मागोवा घेण्यासाठी सोडण्यात येणारा ‘स्कॅटसॅट-१’ आणि आणखी एक विदेशी उपग्रह असे दोन उपग्रह निरनिराळ््या कक्षांमध्ये सोडेल. पृथ्वीवरील वाहनाने एकाच सफरीत अनेक ठिकाणी थांबून प्रवाशांना सोडावे तसेच हे आहे.
पीएसएलव्हीचे विक्रमी २० उपग्रहांसह यशस्वी प्रक्षेपण करण्यात आल्याबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन.
- प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती
इस्रो सातत्याने नवनवे टप्पे गाठत आहे. या संस्मरणीय यशाबद्दल आमच्या शास्त्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन. आमच्या अंतराळ कार्यक्रमाने वेळोवेळी लोकांच्या जीवनात विज्ञान व तंत्रज्ञानातील परिवर्तनातील क्षमता सिद्ध केली आहे. पुणे व चेन्नईच्या विद्यार्थ्यांनी उपग्रह बनविण्यात मोलाची भूमिका बजावली, ही आनंदाची बाब आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान