इस्त्रोचे यश! प्रक्षेपण यान पुन्हा वापरता येणार, RLV प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2023 12:41 PM2023-04-03T12:41:08+5:302023-04-03T12:41:21+5:30
रि-युजेबल लाँच व्हेईकल (RLV) स्वत:हून उतरण्याच्या प्रक्रियेची यशस्वी चाचणी
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) रविवारी आणखी एक मोठे यश मिळाले. संस्थेने पुन्हा वापर करता येऊ शकणाऱ्या प्रक्षेपण यानाच्या (रि-युजेबल लाँच व्हेईकल-आरएलव्ही) स्वत:हून उतरण्याच्या प्रक्रियेची (ऑटोनॉमस लँडिंग मिशन) यशस्वी चाचणी घेतली.
उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर हे प्रक्षेपण यान (आरएलव्ही) पृथ्वीवर परत येईल व त्याच्याद्वारे पुन्हा दुसरा एखादा उपग्रह प्रक्षेपित केला जाऊ शकेल. आतापर्यंतची उपग्रह प्रक्षेपण वाहने आकाशात गेल्यानंतर नष्ट होत होती. आरएलव्ही उपग्रह प्रक्षेपित करून परतणार असल्याने उपग्रह प्रक्षेपण मोहिमांवरील खर्चात मोठी बचत होणार आहे.
कशी झाली चाचणी?
जगात प्रथमच विंग बॉडीच्या या यानाला साडेचार किलोमीटर उंचीवर नेऊन ४.६ किमी अंतरावर सोडण्यात आले. त्यानंतर ते संथ गतीने उड्डाण करत काही वेळाने स्वत:च लँडिंग गिअर टाकून एटीआरच्या हवाईपट्टीवर उतरले. इस्रोसोबत हवाई दल, डीआरडीओ, सेंटर फॉर मिलिटरी एअरवॉर्थिनेस अँड सर्टिफिकेशन, एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट आणि एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट यांनी या चाचणीसाठी योगदान दिले.
आरएलव्ही प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज
- अचूक नेव्हिगेशन
- हार्डवेअर व सॉफ्टवेअर
- स्यूडोलाइट प्रणाली
- का-बँड रडार अल्टिमीटर
- नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलशन रिसिव्हर
- स्वदेशी लँडिंग गियर
- एअरोफिल हनी-कॉम्ब फिन्स
- ब्रेक पॅराशूट प्रणाली