ISRO चे यान थेट सूर्याकडे झेपावणार; या दिवशी सुरू होणार ‘मिशन सूर्य’, पाहा डिटेल्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 08:49 PM2023-08-23T20:49:53+5:302023-08-23T20:50:21+5:30
इस्रो चंद्रयान-3 च्या यशानंतर सूर्याच्या दिशेने आदित्य एल-1 यान पाठवणार आहे. सूर्याचा अभ्यास का महत्वाचा, जाणून घ्या...
ISRO Chandrayaan 3:भारताने आज इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान पाठवणारा भारत पहिला देश बनला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी(इस्रो) चंद्रयान-3 मोहीम अत्यंत गुंतागुंतीची होती. दोन दिवसांपूर्वीच रशियाचे यान कोसळल्यानंतर भारतापुढे सुरक्षित यान उतरवण्याचे मोठे आव्हान होते. पण, इस्रो शास्त्रज्ञांच्या मेहनतीचे चीज झाले अन् विक्रम लँडर सुरक्षिततरित्या चंद्रावर उतरले. या मोहिमेनंतर इस्रो आणखी एक मोठी आव्हानात्मक मोहीम राबवणार आहे.
इस्रो ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला आदित्य एल-1 मिशन लॉन्च करणार आहे. इस्रोचे हे आतापर्यंतचे सर्वात अवघड मिशन असणार आहे. एल-1 मिशनद्वारे इस्रोचे या थेट सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. या मोहिमेद्वारे भारत प्रथमच सौर यंत्रणेत 'स्पेस ऑब्झर्व्हेटरी' तैनात करणार आहे. आदित्य एल-1 अंतराळयान सूर्यावर लक्ष ठेवण्याचे काम करेल. या काळात हे यान सूर्यावर घडणाऱ्या विविध घटनांची माहिती इस्रोला देईल.
PSLV-C57/Aditya-L1 Mission:
— ISRO (@isro) August 14, 2023
Aditya-L1, the first space-based Indian observatory to study the Sun ☀️, is getting ready for the launch.
The satellite realised at the U R Rao Satellite Centre (URSC), Bengaluru has arrived at SDSC-SHAR, Sriharikota.
More pics… pic.twitter.com/JSJiOBSHp1
लॅग्रेंज पॉईंटपर्यंत यान पाठवले जाईल
भारताने आजपर्यंत लॅग्रेंज पॉईंटपर्यंत अंतराळयान पाठवलेले नाही. लॅग्रेंज पॉइंट हा अंतराळातील दोन किंवा अधिक मोठ्या वस्तूंमधील एक बिंदू आहे (जसे की सूर्य आणि पृथ्वी दरम्यानची पोकळी). येथे एखादे अवकाशयान पाठवले तर ते दोन महाकाय वस्तूंच्या गुरुत्वाकर्षणामुळे एकाच जागी स्थिर राहते. आदित्य अंतराळयान पृथ्वीपासून 15 लाख किमी दूर पाठवले जाईल. या टप्प्यावर अंतराळयान स्थिर ठेवणे फार कठीण काम आहे.
या उपकरणांच्या सहाय्याने सूर्याचा अभ्यास होणार
पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये पाच लॅग्रेंज बिंदू आहेत, ज्यामध्ये आदित्यला लॅग्रेंज-1 वर पाठवले जाईल. आदित्य L-1 अंतराळयानामध्ये SUIT आणि VELC अशी दोन मोठी उपकरणे असतील. हे भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केली आहेत. स्पेक्ट्रोपोलारिमेट्रिक मापन VELC द्वारे केले जाईल. सोप्या भाषेत सांगायचे तर या यंत्राद्वारे सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास केला जाणार आहे. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्याची ही पहिलीच वेळ असेल.
सूर्याचा अभ्यास का आवश्यक आहे?
आदित्य एल-1 अंतराळयान हे अवकाश दुर्बिणीसारखे असेल. या मिशनची दोन मुख्य कार्ये आहेत. पहिले म्हणजे सूर्याचा दीर्घकाळ शास्त्रीय अभ्यास करणे आणि दुसरे म्हणजे आपले उपग्रह वाचवणे. सूर्यापासून रेडिएशन आणि सौर वादळांचा धोका आहे. त्यामुळे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत असलेल्या उपग्रहांचे नुकसान होते. एवढेच नाही तर सौर वादळामुळे विद्युत ग्रीडमध्ये बिघाड होतो.
सूर्यापासून सौर वादळांचा धोका तर आहेच, पण त्यामुळे होणारे कोरोनल मास इजेक्शन आणि सौर फ्लेअर्सही पृथ्वीसाठी धोकादायक ठरू शकतात. हे रेडिओ कम्युनिकेशन खराब करू शकतात. अंतराळातील अंतराळवीरांनाही त्याच्याकडून इजा होऊ शकते. आदित्य एल-1 अंतराळयानाचे काम सूर्यप्रकाशात होणाऱ्या या घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे आहे. एक प्रकारे, हे एक चेतावणी प्रणाली म्हणून काम करेल.