"ISRO वर दररोज 100 पेक्षा अधिक सायबर हल्ले"; एस. सोमनाथ यांचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 14:27 IST2023-10-09T14:23:40+5:302023-10-09T14:27:46+5:30
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) प्रमुख म्हणाले की, देशाच्या अंतराळ संस्थेला दररोज 100 हून अधिक सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे.

"ISRO वर दररोज 100 पेक्षा अधिक सायबर हल्ले"; एस. सोमनाथ यांचा मोठा खुलासा
चंद्रयान-3 च्या यशानंतर जगभरात इस्रोची जोरदार चर्चा होत आहे. इस्रोला यशाबरोबरच नवीन आव्हानांनाही तोंड द्यावं लागत आहे. आपल्या नियमित कामासोबतच इस्रो एका वेगळ्या आघाडीवर अज्ञात शत्रूंविरुद्धही लढत आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी याबाबत माहिती दिली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) प्रमुख म्हणाले की, देशाच्या अंतराळ संस्थेला दररोज 100 हून अधिक सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे. ISRO प्रमुख दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय सायबर कॉन्फरन्स c0c0n च्या 16 व्या आवृत्तीत भाग घेण्यासाठी केरळमधील कोची येथे आले होते.
TOI शी बोलताना सोमनाथ म्हणाले की, इस्रोच नाही तर इतर अनेक यंत्रणांना शेकडो सायबर (हॅकिंग) प्रयत्नांचा सामना करावा लागतो. परंतु असे प्रयत्न आमच्या अनेक सुरक्षा उपायांद्वारे रोखले जातात. सोमनाथ म्हणाले की, सायबर प्रयत्न सुरक्षा व्यवस्थेत घुसण्यात यशस्वी झाला तरच हल्ला होतो. मात्र असं झालेलं नाही. अशा प्रयत्नांना तोंड देण्यासाठी इस्रोकडे मजबूत सुरक्षा नेटवर्क आहे. आमच्याकडे अनेक फायरवॉल आणि सुरक्षा यंत्रणा आहेत. म्हणून, या सर्व प्रयत्नांना एका बिंदूच्या पलीकडे परवानगी नाही आणि आमच्या फायरवॉलच्या बाह्य स्तरावर थांबते.
रॉकेट तंत्रज्ञानात सायबर हल्ल्याची भीती
सोमनाथ पुढे म्हणाले की, रॉकेट तंत्रज्ञानामध्ये सायबर हल्ल्याची शक्यता खूप जास्त आहे. यात अल्ट्रा-मॉडर्न सॉफ्टवेअर आणि चिप-आधारित हार्डवेअरचा वापर केला जातो. इस्रो प्रमुख म्हणाले की, सॉफ्टवेअरची सर्वसमावेशक तपासणी करण्याव्यतिरिक्त, रॉकेटमधील हार्डवेअर चिप्सची सुरक्षितता सत्यापित करण्यासाठी ISRO चाचण्या देखील घेते. ते म्हणाले की, पूर्वी एका उपग्रहावर देखरेख ठेवण्याची पद्धत बदलून सॉफ्टवेअरद्वारे एकावेळी अनेक उपग्रहांवर नजर ठेवण्याची पद्धत बदलली आहे.
सायबर सुरक्षा महत्त्वाची
या सर्वांच्या सुरक्षेसाठी सायबर सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याचे इस्रोचे प्रमुख म्हणाले. ते म्हणाले की प्रगत तंत्रज्ञान एकाच वेळी वरदान आणि धोका दोन्ही आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगारांनी मांडलेल्या आव्हानांना आपण याच तंत्रज्ञानाने तोंड देऊ शकतो. या दिशेने संशोधन आणि मेहनत व्हायला हवी. अशा सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी इस्रो पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.