इस्रोने केले सीमोल्लंघन; गगनयानची पहिली चाचणी झाली यशस्वी, PM मोदींनी केले अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 06:26 AM2023-10-22T06:26:08+5:302023-10-22T06:26:56+5:30

माणसाला अंतराळात घेऊन जाणारे गगनयान मिशन तीन दिवसांचे असणार आहे.

isro first test of gaganyaan successful | इस्रोने केले सीमोल्लंघन; गगनयानची पहिली चाचणी झाली यशस्वी, PM मोदींनी केले अभिनंदन

इस्रोने केले सीमोल्लंघन; गगनयानची पहिली चाचणी झाली यशस्वी, PM मोदींनी केले अभिनंदन

श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) गगनयान मिशनच्या ‘चालकदल सुटका यंत्रणे’ची (क्रू एस्केप सिस्टम) यशस्वी चाचणी शनिवारी केली. ‘टेस्ट व्हिहिकल अबॉर्ट मिशन-१’ (टीव्ही-डी१) असे नाव या मिशनला देण्यात आले होते. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी १०:०० वाजता त्याचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. 

भारत अंतराळात माणूस पाठविण्यासाठी सध्या गगनयान मोहिमेवर काम करीत असून, याच मोहिमेअंतर्गत ‘टीव्ही-डी१’ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. गगनयानात अचानक काही बिघाड झाल्यास अंतराळवीरांना त्यातून बाहेर काढून पृथ्वीवर सुरक्षित आणण्यासाठी ‘चालकदल सुटका यंत्रणा’ वापरली जाणार आहे. तिचीच चाचणी शनिवारी घेण्यात आली. 

इस्रोने म्हटले की, आजच्या यशाच्या आधारावरच पहिले गगनयान मिशन सुरू होईल. माणसाला अंतराळात घेऊन जाणारे गगनयान मिशन तीन दिवसांचे असणार आहे. गगनयान मिशनद्वारे अंतराळवीरांना पृथ्वीच्या सर्वाधिक खालच्या म्हणजेच ४०० किलोमीटर अंतरावरील कक्षेत पाठवून पुन्हा सुरक्षित पृथ्वीवर आणण्यात येणार आहे.

अशी झाली चाचणी

इंधन भरल्यानंतर चाचणी रॉकेटने क्रू मोड्यूलसह आकाशात झेप घेतली. रॉकेटचा वेग ध्वनीपेक्षा १.२ पट अधिक होता. त्यानंतर मिशन रद्द करण्याजोगी स्थिती यानात निर्माण करण्यात आली. रॉकेट आकाशात १७ किलोमीटर उंचावर असताना क्रू मोड्यूल आणि चालकदल सुटका यंत्रणा रॉकेटपासून वेगळे झाले. क्रू मोड्यूलला सुमारे २ किलोमीटर दूर नेण्यात आले. श्रीहरिकोटा येथून १० किलोमीटर दूर समुद्रात पॅराशूटच्या साहाय्याने ते सुरक्षित उतरविण्यात आले. ८.८ मिनिटांत ही मोहीम तंतोतंत अचूकतेने फत्ते करण्यात आली. समुद्रात उतरविण्यात आलेले क्रू मोड्यूल शोधण्याची जबाबदारी नौदलावर सोपविण्यात आली.

मिशनचा प्रत्येक टप्पा यशस्वी

आजची चाचणी नियोजित प्रक्षेपण कालावधीतच पूर्ण झाली. मिशनचा प्रत्येक टप्पा यशस्वी झाला. चालकदल सुटका यंत्रणेने क्रू मोड्यूलला दूर नेणे, क्रू मोड्यूलचे सर्व संचालन व्यवस्थित होणे, चालकदल सुटका यंत्रणा वेगळी होणे, सर्व पॅराशूट उघडणे आणि समुद्रात उतरणे या सर्व प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे पार पाडण्यात इस्रोला यश मिळाले.  - एस. सोमनाथ, अध्यक्ष, इस्रो

भारताची मानवी अंतराळ उड्डाण मोहीम ‘गगनयान’ प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आजच्या प्रक्षेपणामुळे टाकले गेले आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मी अभिनंदन करतो. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

 

Web Title: isro first test of gaganyaan successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :isroइस्रो