ISRO च्या 'गगनयान' मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांची निवड कशी झाली? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 06:52 PM2024-02-27T18:52:20+5:302024-02-27T18:54:55+5:30
ISRO Gaganyaan: आज ISRO च्या महत्वकांशी गगनयान मोहिमेद्वारे अंतराळात जाणाऱ्या 4 अंतराळवीरांची नावे घोषित झाली.
ISRO Gaganyaan: पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी ISRO च्या महत्वकांशी गगनयान स्पेस मिशनच्या चार अंतराळवीरांच्या नावांची घोषणा केली. गगनयान मोहिमेत जाणारे सर्व अंतराळवीर हवाई दलात ग्रुप कॅप्टन किंवा विंग कमांडर या पदावर कार्यरत आहेत. ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला, अशी या सर्व अंतराळवीरांची नावे आहेत.
गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांचा परिचय करुन देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'ही फक्त चार नावे नाहीत, या चार 'शक्ती' आहेत, ज्या 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा अंतराळात घेऊन जातील.' दरम्यान, गगनयानाद्वारे 40 वर्षांनंतर एखादा भारतीय अंतराळात जाणार आहे. यापूर्वी राकेश शर्मा 1984 मध्ये अंतराळात गेले होते. गगनयान मोहिमेसाठी या चार अंतराळवीरांची निवड कशी झाली ते जाणून घेऊया.
#WATCH | Prime Minister Narendra Modi reviews the progress of the Gaganyaan Mission and bestows astronaut wings to the astronaut designates.
— ANI (@ANI) February 27, 2024
The Gaganyaan Mission is India's first human space flight program for which extensive preparations are underway at various ISRO centres. pic.twitter.com/KQiodF3Jqy
निवड कशी झाली?
या मोहिमेसाठी निवडलेले सर्व अंतराळवीर हे भारतीय हवाई दलातील वैमानिक आहेत. त्यांची नावे 4 वर्षांपूर्वी फायनल झाली होती. अंतराळवीरांच्या निवडीसाठी हवाई दलाच्या शेकडो वैमानिकांची चाचणी घेण्यात आली. या वैमानिकांवर क्लिनिकल आणि एरोमेडिकलसह अनेक चाचण्या घेण्यात आल्या. या सर्वांमधून 12 जणांची निवड करण्यात आली. यानंतर, निवड प्रक्रियेच्या आणखी अनेक फेऱ्या झाल्या, ज्याद्वारे अंतिम चौघांची निवड झाली.
प्रशिक्षण कसे चालते?
गगनयानच्या चार अंतराळवीरांचे प्रशिक्षण तीन वर्षांपासून सुरू आहे. सुरुवातीला त्यांना 13 महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी रशियातील गॅगारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठवण्यात आले. सध्या, ते चौघेही बंगळुरुमध्ये इस्रोने बांधलेल्या ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये (HSFC) प्रशिक्षण घेत आहे. अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी भारतीय सुरक्षा दलही मदत करत आहेत.
काय आहे गगनयान मिशन, कधी सुरू होणार?
गगनयान मोहिमेत 4 भारतीयांना पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचीच्या कक्षेत पाठवले जाईल. तिथे ते 3 दिवस राहतील आणि नंतर पृथ्वीवर सुरक्षितपणे परत येतील. गगनयान मोहीम यशस्वी झाल्यास, अंतराळात मानवी मोहीम पाठवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल. आत्तापर्यंत फक्त अमेरिका, रशिया आणि चीनलाच ही कामगिरी करता आली आहे.
गगनयान मोहिमेचे काम वेगाने सुरू आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पहिले चाचणी उड्डाण यशस्वी झाले. 2024 च्या तिसऱ्या महिन्यात मानवरहित 'व्योमित्र' मोहीम प्रक्षेपित केली जाईल, असे अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. तर, देशाचे पहिले मानवयुक्त मिशन “गगनयान” पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये प्रक्षेपित केले जाणार आहे.