ISRO : के. सिवन यांचा कार्यकाळ संपुष्टात, 'इस्रो'च्या प्रमुखपदी एस. सोमनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 10:15 PM2022-01-12T22:15:48+5:302022-01-12T22:18:00+5:30
एस. सोमनाथ हे वरिष्ठ रॉकेट शास्त्रज्ञ असून सध्या ते विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात संचालक आहेत. आता, पुढील 3 वर्षांपर्यंत एस. सोमनाथ हे इस्रोचे प्रमुख असणार आहेत.
नवी दिल्ली - एस. सोमनाथ यांना भारतीय स्पेस रिसर्च सेंटरच्या (ISRO) प्रमुखपदी नियुक्त करण्यात आलं आहे. सध्याचे इस्रो चीफ के. सिवन यांच्याजागी लवकरच ते आपला पदभार स्विकारतील. केंद्र सरकारने बुधवारी आदेश जारी केला असून याबाबतची माहिती दिली. 14 जानेवारी रोजी सिवन यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. यापूर्वी सिवन यांना 1 वर्षे कार्यकाळ वाढवून दिला होता. त्यामुळे, तीन वर्षे इस्रोच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर के. सिवन आता निवृत्त होत आहेत.
एस. सोमनाथ हे वरिष्ठ रॉकेट शास्त्रज्ञ असून सध्या ते विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात संचालक आहेत. आता, पुढील 3 वर्षांपर्यंत एस. सोमनाथ हे इस्रोचे प्रमुख असणार आहेत. सोमनाथ हे करिअरच्या सुरुवातीच्या काळात पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हीकल (PSLV) एकीकरणच्या पथकाचे प्रमुख होते. 22 जानेवारी 2018 पासून ते व्हीएसससी येथे संचालक पदावर कार्यरत आहेत.
एस सोमनाथ उच्च-दाब सेमी-क्रायोजेनिक इंजिनच्या विकास कामाचा एक भाग आहे. चांद्रयान-2 लँडरचे इंजिन विकसित करणे आणि GSAT-9 मध्ये बसवलेले इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टीमचे उड्डाण यशस्वी करणे या यशातही त्यांचा वाटा आहे. सोमनाथ लाँच वाहनांसाठी डिझाइन सिस्टममध्ये तज्ञ आहेत. उपग्रह प्रक्षेपणासाठी जगभरात प्राधान्य असलेल्या पीएसएलव्हीचे इंटिग्रेशन डिझाइन तयार करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
जगाचे लक्ष लागलेल्या भारतीय 'चांद्रयान 2' मोहीमेत आलेल्या अडचणीमुळे इस्रोचे प्रमुख के सिवन अतिशय भावुक झाले होते. त्यावेळी, इस्रोच्या कंट्रोल रुममधील संबोधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर आले आणि भावुक झालेले इस्रो प्रमुख रडू लागले. मोदींनी गळाभेट घेतल्यानंतर के सिवन यांनी अश्रूंना मोकळी वाट करुन दिली. त्यावेळी, संपूर्ण देशवासीय तुमच्या पाठीशी आहेत, असं म्हणत के सिवन यांना धीर दिला होता. मोदी आणि सिवन यांच्याती चांद्रयान भेटीचा हा क्षण देशभर लक्षणीय ठरला होता.