ISROने लाँच केले सर्वात लहान रॉकेट, पण काही मिनिटात सॅटेलाइटशी संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 01:39 PM2022-08-07T13:39:59+5:302022-08-07T13:40:48+5:30
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आज देशातील सर्वात लहान रॉकेट SSLV लाँच केले.
नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आज (7 ऑगस्ट 2022) देशातील सर्वात लहान रॉकेट स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (SSLV) लाँच केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅड 1 वरून हे प्रक्षेपण यशस्वीपणे पार पडले, परंतु रॉकेटला लक्ष्य गाठण्यात अडथळा निर्माण झाला आहे. लाँचिंगच्या काही मिनिटानंतर सॅटेलाइटने डेटा देणे बंद केले आहे. सध्या इस्रो या डेटाचे विश्लेषण करत आहेत.
SSLV-D1/EOS-02 Mission: Maiden flight of SSLV is completed. All stages performed as expected. Data loss is observed during the terminal stage. It is being analysed. Will be updated soon.
— ISRO (@isro) August 7, 2022
इस्रोने ट्विट करुन याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, इस्रोकडून त्यांच्या सर्वात लहान रॉकेट, SSLV-D1 प्रक्षेपणाच्या डेटाचे विश्लेषण करत आहे. आज सकाळी श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रावरून हे पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि एक विद्यार्थी उपग्रह लाँच करण्यात आले. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले, SSLV-D1 ने सर्व टप्प्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात काही समस्या आहेत. स्थिर कक्षा गाठण्याच्या संदर्भात आम्ही मिशनचा अंतिम निकाल काढतो आहोत.
SSLV 34 मीटर लांब असून, तो PSLVपेक्षा सुमारे 10 मीटर लहान आहे. पीएसएलव्हीच्या 2.8 मीटरच्या तुलनेत त्याचा व्यास दोन मीटर आहे. PSLV चे वजन 320 टन आहे, तर SSLV चे वजन 120 टन आहे. PSLV 1800 किलो वजनाचा पेलोड वाहून नेऊ शकतो. देशातील पहिले सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल 3, जे 1980 मध्ये लॉन्च केले गेले होते, ते 40 किलोपर्यंतचे पेलोड वाहून नेऊ शकत होते.