ऐतिहासिक! इस्रोकडून जगातील सर्वात हलक्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 07:55 AM2019-01-25T07:55:56+5:302019-01-25T08:08:18+5:30
मायक्रोसॅट आणि कलामसॅट उपग्रहांचं प्रक्षेपण करत इस्रोनं रचला इतिहास
श्रीहरीकोटा: भारतीय अंतराळ संधोधन संस्थेनं (इस्रो) इतिहास रचला आहे. काल रात्री उशिरा आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून इस्रोनं जगातील सर्वात हलक्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. काल रात्री 11 वाजून 37 मिनिटांनी इस्रोनं मायक्रोसॅट-आर आणि कलामसॅटचं प्रक्षेपण केलं. मायक्रोसॅट उपग्रहामुळे लष्कराला मोठी मदत मिळणार आहे. तर कलामसॅट हा उपग्रह विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. पीएसएलव्ही-सी44 च्या मदतीनं या दोन्ही उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं.
Andhra Pradesh: #ISRO launches #PSLVC44 mission, carrying #Kalamsat and #MicrosatR from Satish Dhawan Space Centre, Sriharikota. pic.twitter.com/yBI7xlKARK
— ANI (@ANI) January 24, 2019
मायक्रोसॅट आणि कलामसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोचं अभिनंदन केलं. 'पीएसएलव्हीच्या आणखी एका यशस्वी प्रक्षेपणाबद्दल वैज्ञानिकांचं अभिनंदन. या प्रक्षेपणामुळे भारताच्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या कलामसॅटनं कक्षेत प्रवेश केला आहे,' अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी इस्रो आणि विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. पंतप्रधानांसोबतच इस्रोच्या प्रमुखांनीही वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव केला. इस्रो देशातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. तुमचे उपग्रह आमच्याकडे घेऊन या. आम्ही त्यांचं प्रक्षेपण करू, अशा शब्दांमध्ये इस्रो प्रमुख के. सिवन यांनी विज्ञानवाद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर आवाहन केलं.
Heartiest congratulations to our space scientists for yet another successful launch of PSLV.
— Narendra Modi (@narendramodi) January 25, 2019
This launch has put in orbit Kalamsat, built by India's talented students.
इस्रोनं 2019 मधलं पहिली मोहीम यशस्वी केली आहे. पीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या मदतीनं करण्यात आलेलं हे इस्रोचं 46वं प्रक्षेपण आहे. इस्रोनं प्रक्षेपित केलेला कलामसॅट उपग्रह अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचं वजन केवळ 1.26 किलोग्राम इतकं आहे. विशेष म्हणजे अवघ्या सहा दिवसांमध्ये या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली. चेन्नईतल्या स्पेस किड्स इंडिया या स्टार्टअप कंपनीनं कलामसॅटची निर्मिती केली आहे.