नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ISRO नं रचला इतिहास; अंतराळात लॉन्च केलं XPoSat
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 10:24 AM2024-01-01T10:24:42+5:302024-01-01T10:25:12+5:30
कृष्णविवरासारख्या गूढ रचनांचे रहस्य शोधण्याचे काम करील. हे संशोधन करणारा हा भारताचा पहिला उपग्रह आहे असे इस्रोने म्हटले आहे.
नवी दिल्ली - भारतीय अंतराळ संस्था ISRO नं नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इतिहास रचला आहे. सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी इस्त्रोने PSLV C58/XPoST लॉन्च केले आहे. या मिशनद्वारे अंतराळ आणि ब्लॅक होलच्या रहस्यांबाबत उकल करण्याचा प्रयत्न इस्त्रो करणार आहे. जवळपास ५ वर्ष हे मिशन सुरू राहील. चेन्नईपासून जवळपास १३५ किमी अंतरावरील अंतराळ केंद्रातून एक्स्पोसॅट लॉन्च करण्यात आले.
‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह (एक्स्पोसॅट) हे अंतराळातील तीव्र क्ष-किरण स्रोतांच्या ध्रुवीकरणाची तपासणी, कृष्णविवरासारख्या गूढ रचनांचे रहस्य शोधण्याचे काम करील. हे संशोधन करणारा हा भारताचा पहिला उपग्रह आहे असे इस्रोने म्हटले आहे. अमेरिकेच्या नासानेही असाच अभ्यास केला आहे. त्यांनी डिसेंबर २०२१ मध्ये ‘एक्स-रे पोलरीमेट्री’ मोहिमेंतर्गत सुपरनोव्हा स्फोटांचे अवशेष, कृष्णविवराचा अभ्यास केला होता.
#ISRO begins 2024 in Style!
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) January 1, 2024
Successful launch of PSLV-C58/ 🛰 XPoSat Mission.
Proud to be associated with the Department of Space at a time when Team @isro continues to accomplish one success after the other, with the personal intervention & patronage from PM Sh @narendramodi. pic.twitter.com/cisbjpUYpH
४४.४ मीटर उंच पीएसएलव्ही रॉकेट प्रक्षेपणानंतर २१ मिनिटांनी प्राथमिक उपग्रहाला ६५० कि.मी.च्या पृथ्वीच्या खालील कक्षेत प्रक्षेपित करील. चौथा टप्पा पुन्हा सुरू करून शास्त्रज्ञ उपग्रहाला सुमारे ३५० कि.मी. कमी उंचीवर आणतील. प्रक्षेपक हे पीएसएलव्ही-डीएल प्रकारातील असून त्याचे वजन २६० टन आहे. या मोहिमेचे आयुष्य ५ वर्षे आहे. विशेष म्हणजे XPoSat च्या लॉन्चिंगच्या एक दिवसाआधी वैज्ञानिकांनी तिरुपतीला जाऊन व्यंकटेश्वराची पूजा केली होती. हे सॅटेलाईट अंतराळात होणाऱ्या रेडिएशनवर अभ्यास करेल. ISRO नं या मोहिमेची सुरुवात २०१७ मध्ये केली होती. या मोहिमेसाठी ९.५० कोटी रुपये खर्च आला आहे. लॉन्चिंगनंतर २२ मिनिटांनी एक्स्पोसॅट सॅटेलाईट त्याच्या निर्धारित कक्षेत पोहचला आहे. या उपग्रहामध्ये दोन पेलोड आहेत. पहिला - POLIX आणि दुसरा - XSPECT.
काय आहे पॉलिक्स?
पॉलिक्स हा सॅटेलाईटचा मुख्य पेलोड आहे. त्याला रमन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि यूआर राव सॅटेलाईट सेंटरने बनवले आहे. १२६ किलो वजनाचे हे यंत्र अंतराळात स्रोतांचे चुंबकीय क्षेत्र, रेडिएशन, इलेक्ट्रॉन इत्यादींचा अभ्यास करेल. 8-30 keV श्रेणीच्या ऊर्जा बँडचा हा अभ्यास करेल. पोलिस्क अंतराळात असलेल्या ५० पैकी ४० सर्वात जास्त चमकदार असलेल्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे.