इस्रोला मोठा धक्का, GSAT-6A उपग्रहाशी संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2018 01:30 PM2018-04-01T13:30:04+5:302018-04-01T13:30:04+5:30
स्वदेशी बनावटीच्या GSAT-6A या उपग्रहाचं इस्रोनं यशस्वीरीत्या प्रक्षेपण केल्यानंतर आता त्या उपग्रहाशी संपर्क तुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली- स्वदेशी बनावटीच्या GSAT-6A या उपग्रहाचं इस्रोनं यशस्वीरीत्या प्रक्षेपण केल्यानंतर आता त्या उपग्रहाशी संपर्क तुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. GSAT-6A या उपग्रहाचा भारतीय अवकाश संशोधन संस्थेशी संपर्क खंडित झाला आहे. यामुळे शास्त्रज्ञांबरोबरच लष्करालाही मोठा झटका बसला आहे. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रावरून GSAT-6A या उपग्रहानं गुरुवारी 4.56च्या सुमारास GSLV रॉकेटमधून अवकाशात प्रक्षेपण करण्यात आलं होतं. परंतु 48 तासांपेक्षा कमी वेळात या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. GSAT-6A या उपग्रहाशी आमचा तिस-या दिवशी संपर्क तुटला आहे. तसेच या GSAT-6A या उपग्रहाशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असंही इस्रोकडून सांगण्यात आलं होतं. पॉवर सिस्टीम फेल झाल्यामुळे संपर्क तुटल्याचं आता बोललं जातंय. तिस-या कक्षेत गेल्यानंतर उपग्रहाशी संपर्क तुटला आहे.
इस्रोच्या या उपग्रहामुळे लष्कराच्या सामर्थ्यात वाढ होणार होती. तसेच संपर्काचं जाळ विस्तारण्यासाठी याची मदत झाली असती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा इस्रोच्या या कामगिरीवर समाधान व्यक्त करत त्यांचं अभिनंदन केले होते. GSAT-6A या उपग्रहामध्ये सर्वात मोठी संपर्काची यंत्रणा असल्यानं त्याचा दूरसंचार क्षेत्राला फायदा पोहोचणार होता.
GSAT-6Aमुळे अतिदुर्गम भागात सेवा बजावत असलेल्या जवानांना दुस-या दूरच्या भागातील जवानांशी संपर्क साधणं सहजगत्या शक्य झालं असतं. GSAT-6Aच्या प्रक्षेपणासाठी वापरण्यात आलेल्या जीएसएलव्हीत शक्तिशाली क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आला आहे. या इंजिनाचा चांद्रयान-२ मोहिमेतही वापर केला जाण्याची शक्यता आहे. 2066 किलो वजनाचा हा उपग्रह बनवण्यासाठी 270 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.