एकाचवेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करुन ISRO रचणार इतिहास
By admin | Published: February 11, 2017 09:10 AM2017-02-11T09:10:02+5:302017-02-11T09:10:02+5:30
भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्त्रो येत्या 15 फेब्रुवारीला नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - नेहमीच समस्त भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी करणारी भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्त्रो येत्या 15 फेब्रुवारीला नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. इस्त्रो PSLV C 37 या प्रक्षेपकाव्दारे एकाचवेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करुन नवा जागतिक विक्रम आपल्या नावावर करणार आहे.
एकाचवेळी सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम सध्या रशियाच्या नावावर आहे. जुलै 2014 मध्ये रशियाने एकाचवेळी 37 उपग्रह प्रक्षेपित केले होते. बुधवारी सकाळी 9.28 मिनिटांनी श्रीहरीकोट्टा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरुन PSLV C 37 मधून 104 उपग्रहांचे प्रक्षेपण होईल. पृथ्वी निरीक्षण करणा-या मालिकेतील कार्टोसॅट -2 हा मुख्य उपग्रह असून त्याचे वजन 714 किलो आहे.
अन्य 101 परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले जाणार आहेत. अमेरिकेतील खासगी कंपनीचे 96 नॅऩो उपग्रह असून, इस्त्रायल ,कझाकिस्तान, युएई, नेदरलँड आणि स्वित्झर्लंड या देशांचा प्रत्येकी एक उपग्रह आहे. त्याशिवाय भारताच्या दोन नॅनो उपग्रहांचा समावेश आहे. या सर्व उपग्रहांचे एकत्रित वजन 1378 किलो आहे. पीएसएलव्ही प्रक्षेपकाचे हे 39 वे उड्डाण असेल.