नवा इतिहास रचण्यासाठी इस्रो सज्ज !
By admin | Published: April 20, 2017 02:28 PM2017-04-20T14:28:53+5:302017-04-20T14:28:53+5:30
भारतीय अवकाश संशोधन संस्थे (इस्त्रो)च्या शिरपेचात लवकरच आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 20 - भारतीय अवकाश संशोधन संस्थे (इस्त्रो)च्या शिरपेचात लवकरच आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. इस्रो पहिल्यांदाच चार टन वजनाचा उपग्रह अवकाशात पाठवण्याचा तयारीत असून, मे महिन्यात या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. इस्रोनं आतापर्यंत 2.2 टन वजनापर्यंतचे उपग्रह वाहून नेणारी क्षमता असलेले रॉकेट अवकाशात सोडले आहेत. मात्र त्याहून अधिक वजनाच्या उपग्रह प्रक्षेपणासाठी परदेशी लाँचिंग रॉकेटचा वापर करण्यात येत होता. पुढच्या महिन्यात इस्त्रोच्या श्रीहरिकोटा या अवकाश केंद्रातून हा उपग्रह अवकाशात झेपावणार आहे, अशी माहिती इस्त्रोचे प्रमुख एस. किरण कुमार यांनी दिली आहे.
ते म्हणाले, चार टन वजनाच्या उपग्रहाचे नाव जीएसएलव्ही-एमके 3डी असून, पुढच्याच महिन्यात ते प्रक्षेपित करण्यात येणार आहे. ही मोहीम फत्ते झाल्यास भारताला जास्त वजनाचे उपग्रह सोडण्यासाठी परदेशी बनवटीच्या रॉकेटवर अवलंबून राहावं लागणार नाही. तसेच भारत आता 4 टन वनजाच्या उपग्रहांच्या निर्मितीवरही लक्ष्य केंद्रित करत असून, ही मोहीम यशस्वी झाल्यास मागील वर्षभरात इस्त्रोची ही दुसरी गगनभरारी ठरणार आहे. याआधी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी इस्त्रोने एकाच वेळी 104 उपग्रहांचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करण्याचा विक्रम केला आहे. पीएसएलव्ही 37 या सिद्धहस्त अग्निबाणाच्या एकाच उड्डाणात तब्बल 104 उपग्रहांचे अंतराळात विविध कक्षांमध्ये एकाच वेळी यशस्वी प्रक्षेपण करून भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) नवे यशोशिखर गाठत भारताची मान आणखी ताठ केली आहे.
आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून याचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. तसेच शेती आणि पाण्याच्या समस्या दूर करण्यासाठीदेखील इस्त्रोने प्रयत्नशील असून, कर्नाटकाच्या स्टेट कॉफी बोर्डाने राज्यातल्या कॉफीच्या शेतीसाठी इस्त्रोशी करार केला आहे. या करारानुसार राज्यात एकूण किती हेक्टर क्षेत्रावर कॉफीचे उत्पादन घ्यावे याची माहिती इस्त्रो रिमोट सेंसिंग तंत्रज्ञानाद्वारे देणार आहे. उत्तर-पूर्वेच्या राज्यांनाही ही माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. देशात पाण्याचे किती स्त्रोत आहेत, याची माहितीही इस्त्रो देणार असून, आंध्र प्रदेश सरकारने यासाठी करार केला आहे.