चंद्रयान-२चं काऊंटडाऊन सुरू; उद्या दुपारी झेपावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 07:46 PM2019-07-21T19:46:00+5:302019-07-21T19:47:32+5:30
गेल्या आठवड्यात तांत्रिक कारणामुळे रद्द झालं होतं प्रक्षेपण
श्रीहरीकोटा: इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची तयारी पूर्ण झाली आहे. आज संध्याकाळी ६.४३ मिनिटांनी या मोहिमेचं काऊंटडाऊन सुरू झालं. उद्या दुपारी २.४३ मिनिटांनी चंद्रयान-२ अवकाशात झेपावलं. सहा दिवसांपूर्वी चंद्रयान-२चं प्रक्षेपण होणार होतं. मात्र तांत्रिक कारणामुळे इस्रोनं हे मिशन पुढे ढकललं.
#ISRO: The launch countdown of #Chandrayaan2 commenced today at 1843 hours IST. The launch is scheduled at 1443 hours IST on July 22nd. pic.twitter.com/ltdljkSXGz
— ANI (@ANI) July 21, 2019
चंद्रयान-२च्या प्रक्षेपणासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण झाल्याचं इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी सांगितलं. '१५ जूनला प्रक्षेपणादरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्या आता दूर करण्यात आल्या आहेत. आता चंद्रयान-२चं काऊंटडाऊन सुरू झालं आहे,' असं सिवन म्हणाले. अशा प्रकारच्या मोहिमांवेळी आम्ही विविध स्तरांवर चाचण्या घेतो. गेल्या वेळी प्रक्षेपणाच्या आधी एक अडचण निर्माण झाली. मात्र ती समस्या सोडवण्यात आम्हाला यश आलं आहे. त्यामुळे चंद्रयान-२ च्या प्रक्षेपणासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, असं इस्रोचे माजी प्रमुख ए.एस किरण कुमार यांनी सांगितलं.
चंद्रयान-२ मोहीम २२ जुलैपासून सुरू होईल. १४ ऑगस्टपासून चंद्राजवळ जाण्याचा प्रवास सुरू होईल, अशी तारीखवार माहिती कुमार यांनी दिली. सध्या संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या मोहिमेत जीएसएलव्ही मार्क III-एम 1 प्रक्षेपक म्हणून काम करेल, अशी माहिती त्यांनी दिली. १५ जुलैला चंद्रयान-२ अवकाशात झेपावणार होतं. मात्र इंजिनमधून गळती झाल्यानं हे प्रक्षेपण रद्द झालं.