अंतराळात दिसणार भारताची ताकद! ISRO पाठवणार रोबोट, गगनयान मिशनआधी मोठी झेप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 01:41 PM2023-12-14T13:41:41+5:302023-12-14T13:42:18+5:30
इस्रोने सूर्य मिशनसाठी आदित्य एल-1 लाँच केलं. आता इस्रोचा फोकस मानवी मिशन गगनयानवर आहे.
चंद्रयान-3 मिशनच्या यशानंतर, भारतीय अंतराळ संस्था सतत नवनवीन ध्येय गाठत आहे. सर्वप्रथम इस्रोने सूर्य मिशनसाठी आदित्य एल-1 लाँच केलं. आता इस्रोचा फोकस मानवी मिशन गगनयानवर आहे. या मिशनअंतर्गत एक स्पेसक्राफ्ट अंतराळात पाठवलं जाणार आहे, ते भारताच्या पहिल्या मानवी मिशनची रिहर्सल म्हणून पाठवलं जात आहे. गगनयान मिशनच्या तयारीसाठी इस्रो दीर्घकाळापासून काम करत आहे.
एका स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून महिला रोबोट व्योममित्रला स्पेसमध्ये पाठवण्याची तयारी केली जात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी बुधवारी सांगितलं की, मानवी मिशनपूर्वी महिला रोबोटिक अंतराळवीर व्योममित्रला अंतराळात लाँच करणार आहे. एका खासगी वाहिनीवरील कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. ISRO चं महत्त्वाकांक्षी गगनयान मिशन ह्यूमन स्पेसफ्लाइटमध्ये भारताची क्षमता जगाला दाखवण्यासाठी सज्ज आहे.
मानवयुक्त मिशनच्या अगोदर, इस्रोने महिला रोबोट अंतराळवीर 'व्योममित्र' घेऊन जाणारे चाचणी उड्डाण पुढील वर्षासाठी नियोजित केलं आहे. अंतराळात तसेच समुद्रात भारताची ताकद वाढवण्यासाठी इस्रोने डीप सी मिशनची तयारी केली आहे, जी पुढील तीन-चार वर्षांत पूर्ण होईल. या मिशनद्वारे इस्रो खोल समुद्रातील संसाधनांचा शोध घेईल. जेणेकरुन भारताची शक्ती केवळ अंतराळातच नाही तर समुद्राच्या खोलवरही दिसून येईल.
डॉ सिंह यांनी घोषित केलं की भारताचं अंतराळ क्षेत्र वेगाने विकासाच्या मार्गावर आहे आणि म्हणाले की देशाची अंतराळ अर्थव्यवस्था, ज्याचे मूल्य सध्या $8 बिलियन इतके आहे, 2040 पर्यंत प्रभावी $40 बिलियन पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यांनी स्पेस स्टार्टअप्समध्ये खासगी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीवर प्रकाश टाकला, ज्यांनी या आर्थिक वर्षात एप्रिलपासून एकत्रितपणे 1000 कोटींहून अधिक निधी उभारला आहे.