‘इस्रो’ अंतराळात महिलेला पाठवणार; वैमानिक व शास्त्रज्ञांना संधी: एस. सोमनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 05:29 AM2023-10-23T05:29:28+5:302023-10-23T05:29:52+5:30
भारताने महत्त्वाकांक्षी मानवी अंतराळ मोहिमेतील गगनयानची पहिली चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, तिरुवनंतपुरम : बहुप्रतीक्षित मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम ‘गगनयान’ मोहिमेसाठी लढाऊ विमान उडविणाऱ्या महिला वैमानिकांना किंवा महिला शास्त्रज्ञांना प्राधान्य देत असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख एस. सोमनाथ यांनी रविवारी सांगितले.
इस्रो पुढीलवर्षी आपल्या मानवरहित गगनयान अंतराळ यानामध्ये एक महिला ह्युमनॉइड (मानवासारखा दिसणारा रोबोट) पाठवेल. तीन दिवसांच्या गगनयान मोहिमेसाठी ४०० किमी पृथ्वीच्या खालच्या कक्षेत मानवांना अंतराळात पाठविणे आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे हे इस्रोचे उद्दिष्ट आहे. आम्हाला भविष्यात अशा संभाव्य महिला उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल, असे एस. सोमनाथ म्हणाले. भारताने शनिवारी महत्त्वाकांक्षी मानवी अंतराळ मोहिमेतील गगनयानची पहिली चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
महिलांना प्राधान्य का?
सोमनाथ म्हणाले की, सध्या सुरुवातीचे उमेदवार हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या पायलटपैकी असतील. ते थोड्या वेगळ्या श्रेणीतील आहेत. आमच्याकडे सध्या महिला पायलट नाहीत. दुसरा पर्याय म्हणजे जेव्हा अधिक वैज्ञानिक उपक्रम असतील. तेव्हा शास्त्रज्ञ अंतराळवीर म्हणून येतील. त्यामुळे त्यावेळी या मोहिमेसाठी महिलांसाठी अधिक संधी आहेत, असे मला वाटते.