इस्रो पुन्हा घेणार मंगळावर झेप, मंगळयान-२ मोहिमेची तयारी, केले जाणार असे प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 08:36 AM2023-10-02T08:36:17+5:302023-10-02T08:36:48+5:30
Mangalyaan-2 : इस्रोने आपल्या पहिल्या प्रयत्नामध्ये मंगळ ग्रहाच्या कक्षेत एक अंतराळ यान यशस्वीपणे स्थापित केले होते. त्यानंतर आता नऊ वर्षांनंतर पुन्हा एकदा मंगळावर स्वारी करण्याची तयारी इस्रोने केली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आता मंगळावर आणखी एक अंतराळ यान पाठवण्याची तयारी करत आहे. इस्रोने आपल्या पहिल्या प्रयत्नामध्ये मंगळ ग्रहाच्या कक्षेत एक अंतराळ यान यशस्वीपणे स्थापित केले होते. त्यानंतर आता नऊ वर्षांनंतर पुन्हा एकदा मंगळावर स्वारी करण्याची तयारी इस्रोने केली आहे. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताचा दुसरा मार्स ऑर्बिटर मिशन-२ सोबत चार पेलोड घेऊन जाईल. मिळालेल्या माहितीनुसार मंगळयान-२ वरील उपकरणे मंगळ ग्रहाच्या विविध वैशिष्ट्यांची माहिती घेऊन अभ्यास करतील. त्यामध्ये आंतर ग्रहीय धूळ, मंगळ ग्रहाचं वातावरण आणि पर्यावरणाचा समावेश आहे.
इस्रोमधील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, हे सर्व पेलोड विकासाच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत. नऊ वर्षांपूर्वी २४ सप्टेंबर रोजी भारताने आपल्या पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीरीत्या स्थापित करून इतिहास रचला होता. असं यश अन्य कुठल्याही अंतराळ संस्थेला मिळालं नव्हतं. मंगळयान-२ च्या सुरू असलेल्या पूर्वतयारीनुसार दुसऱ्या मंगळ मोहिमेत एक मार्स ऑर्बिट डस्ट एक्सपेरिमेंट (MODEX), एक रेडिओ ऑकल्टेशन प्रयोग, एक एनर्जेटिक आयन स्पेक्ट्रोमीटर आणि एक लँगमुइर प्रोब आणि इलेक्ट्रिक फिल्ड एक्सपिरिमेंटला सोबत घेऊन जाईल.
मंगळयान-२ च्या कागदपत्रांमध्ये सांगण्यात आलंय की, मोडेक्स (MODEX) मंगळ ग्रहावर अधिक उंचीवर होणारी धुळीची निर्मिती, वितरण आणि प्रवाहाला समजण्यासाठी मदत करेल. मंगळ ग्रहावरील आंतरग्रहीय धुलीकणांचं आतापर्यंत कुठलही मोजमाप झालेलं नाही. हे उपकरण हायपरवेलोसिटी(१ किमी/सेकंद) वेगाने प्रवास करून १०० एनएमपेक्षा कमी आकाराच्या मायक्रोमीटर आकाराच्या कणांचा शोध घेऊ शकते. त्यामधून मंगळ ग्रहावरील धुलीकणांचा प्रवाह समजण्यास मदत होईल. तसेच मंगळ ग्रहाभोवती कुठले वलय आहे का आणि तेथील धूळ ही आंतरग्रहीय आहे की फोबोस आणि डेमोस या मंगळाच्या चंद्रांवरून येते याचाही शोध घेतला जाईल.
इस्रो मंगळ ग्रहाच्या वातावरणामध्ये सोलर एनर्जीचे कण आणि सुपर-थर्मल सोलर विंड कणांची ओळख पटवण्यासाठी एक ईआयएससुद्धा विकसित करत आहे. याआधी भारताने आपली मंगळयान-१ मोहीम ५ नोव्हेंबर २०१३ रोजी लॉन्च केली होती. ही मोहीम सहा महिन्यांसाठी डिझाइन केली होती. मात्र त्याने निवृत्त होण्यापूर्वी तब्बल ७ वर्षे काम केले होते.