इस्रोमुळे मिळणार भारतातील इंटरनेटला गती
By Admin | Published: May 21, 2017 05:46 PM2017-05-21T17:46:28+5:302017-05-21T17:46:28+5:30
गेल्या काही वर्षात भारतातील इंटरनेटच्या वापरामध्ये लक्षणीय अशी वाढ झाली आहे. मात्र इंटरनेटचा स्पीड ही भारतातील मोठी समस्या आहे. मात्र आता ही परिस्थिती बदलण्यासाठी इस्रोने कंबर कसली आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - गेल्या काही वर्षात भारतातील इंटरनेटच्या वापरामध्ये लक्षणीय अशी वाढ झाली आहे. मात्र इंटरनेटचा स्पीड ही भारतातील मोठी समस्या आहे. मात्र आता ही परिस्थिती बदलण्यासाठी इस्रोने कंबर कसली आहे. देशातील इंटरनेटची गती वाढवण्यासाठी इस्त्रो तीन उपग्रह सोडणार आहे. हे उपग्रह कार्यान्वीत झाल्यावर भारतातही हायस्पीड इंटरनेट सेवा देणे शक्य होणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना इस्रोचे प्रमुख किरण कुमार म्हणाले, "आम्ही तीन दूरसंचार सॅटेलाइट्स प्रक्षेपित करणात आहोत. येत्या जून महिन्यात जीएसएटी - 19 चे प्रक्षेपण होईल. त्यानंतर जीएसएटी - 11 आणि जीएसएटी -20 यांचे प्रक्षेपण होईल. त्यापेकी जीएसएटी - 19 चे प्रक्षेपण इस्रोचा पुढील पिढीतील प्रक्षेपक जीएसएलव्ही एमके III याद्वारे केले जाईल. या उपग्रहांमध्ये मल्टिपल स्पॉट बीमचा वापर करण्यात येईल. ज्यामुळे इंटरनेट स्पीड आणि कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ होईल. ही मल्टिपल स्पॉट बीम संपूर्ण देशाला आपल्या कक्षेत घेईल."
हे उपग्रह कार्यान्वित झाल्याबरोबर उच्च दर्जाची इंटरनेट सेवा, फोन आणि व्हिडिओ सर्व्हिस देण्यास सुरुवात करतील. अशी माहिती अहमदाबाद स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे तपन मिश्रा यांनी सांगितले.
सध्या भारत हायस्पीड इंटरनेट सेवेच्या क्रमवारीत खूप पिछाडीवर आहे. वेगवान इंटरनेट सेवेच्या क्रमवारीत भारताला सध्या 105 वे स्थान प्राप्त झाले आहे. तर या क्रमवारीत दक्षिण कोरिया 26 एमबीपीएस वेगासह अव्वलस्तानी आहे. या क्रमवारीत श्रीलंका, व्हिएटनामसारखे देशही भारताच्या पुढे आहेत.