'गगनयान' मोहिमेद्वारे महिलेला अंतराळात पाठवणार; 2035 पर्यंत स्पेस स्टेशन, ISRO प्रमुखांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 05:40 PM2023-10-22T17:40:36+5:302023-10-22T17:41:16+5:30
गगनयान मोहिमेत महिलांना प्राधान्य देणार असल्याचे वक्तव्य इस्रो चीफ एस सोमनाथ यांनी केले आहे.
ISRO Gaganyaan Mission: अंतराळातील रहस्य उलगडण्यासाठी भारत सातत्याने मोठ-मोठ्या मोहिमा राबवत आहे. आधी चंद्रयान-3 त्यानंतर सूर्य मिशन आणि आता गगनयान मोहिमेची तयारी सुरू आहे. 'इस्रो' मानवाला अंतराळात पाठवण्यासाठी गगनयान मोहिमेवर काम करत आहे. काल(दि.21) याची चाचणी उड्डाणदेखील यशस्वी झाले आहे. आता इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी मोठी माहिती दिली आहे.
देशाच्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेत महिला फायटर जेट पायलट किंवा वैज्ञानिकांना प्राधान्य दिले जाईल, आणि त्यांना अंतराळात पाठवले जाईल, असे वक्तव्य सोमनाथ यांनी केले आहे. त्यांनी असेही सांगितले की, इस्रो पुढील वर्षी मानवयुक्त गगनयानमध्ये महिला ह्युमनॉइड (मानवासारखा दिसणारा रोबोट) पाठवेल. या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे उद्दिष्ट मानवांना पृथ्वीपासून 400 किमी अंतराळात पाठवून सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे आहे.
गगनयान मोहीम 2025 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. हे अल्पकालीन मिशन असेल. यासाठी, सुरुवातीला हवाई दलातील लढाऊ वैमानिकांकडून चाचणी घेतली जाईल. सध्या आमच्याकडे चाचणीसाठी महिला लढाऊ वैमानिक नाहीत, त्यामुळे भविष्यात महिला वैमानिकांचा शोध घेतला जाईल. दरम्यान, 2035 पर्यंत संपूर्णपणे कार्यरत अंतराळ स्टेशन स्थापन करण्याचे इस्रोचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.