इस्रोची गगन भरारी ! ‘जीसॅट-17’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
By admin | Published: June 29, 2017 10:03 AM2017-06-29T10:03:58+5:302017-06-29T10:48:08+5:30
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अंतराळ मोहिमेत इस्रोनं आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अंतराळ मोहिमेत इस्रोनं आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अत्याधुनिक संचार उपग्रह जीसॅट 17 चे गुरुवारी फ्रेंच गयानामधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. ‘एरियन- 5’ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून जीसॅट 17 हे अंतराळात झेपावले.
जीसॅट 17चे वजन जवळपास 3477 किलोग्रॅम एवढे आहे. या उपग्रहात दूरसंचार सेवेसाठी नॉर्मल सी बँड, एक्स्टेंडेड सी बँड आणि सी बँड आहे. यात हवामानासंबंधी माहिती मिळवण्यासाठी उपकरणही बसवण्यात आले आहे. शिवाय सर्च आणि रेस्क्यू सेवेसाठी जीसॅट 17 ची मदत होणार आहे.
दरम्यान, नियोजित वेळाच्या काही मिनिटं उशिरानं हे उपग्रह आकाशात झेपावले. भारतीय वेळेनुसार बुधवारी उशीरा रात्री 2.29 वाजण्याच्या सुमारास उपग्रह उड्डाण भरावयास हवे होते.
जीसॅट 17 यशस्वीरित्या आकाशात झेपावल्यानंतर यासंबंधी माहिती देणारे ट्विटही एरियन स्पेसचे सीईओ स्टीफन इस्राइल यांनी केले. दरम्यान या महिन्यात इस्त्रोद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेले हे तिसरे उपग्रह आहे.
23 जून -
PSLV-C38 रॉकेटव्दारे 31 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. शुक्रवारी (23 जून ) सकाळी 9 वाजून 29 मिनिटांनी PSLV-C38 रॉकेटने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन उड्डाण भरले. त्यानंतर 16 मिनिटांनी पीएसएलव्हीने कार्टोसॅट - 2 मालिकेतील उपग्रहासह अन्य 29 नॅनो उपग्रहांना आपल्या कक्षेत सोडण्यात आले. इस्त्रोच्या पीएसएलव्हीचे हे 40 वे उड्डाण होते. 31 उपग्रहांमध्ये भारताचे दोन आणि 29 परदेशी उपग्रह आहेत. या उपग्रहांमध्ये कार्टोसॅट -2 मालिकेतील सहावा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला असून कार्टोसॅटमुळे भारताची टेहळणी क्षमता वाढणार आहे. कार्टोसॅटचे वजन 712 किलो असून, अन्य 30 उपग्रहांचे मिळून 243 किलो वजन आहे.
15 फेब्रुवारी -
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात पाठवण्याचा विक्रम केला. PSLV- C37 या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. चेन्नईपासून १२५ कि.मी. अंतरावरील श्रीहरिकोटा येथून बुधवारी सकाळी एकाच वेळी १०४ उपग्रह पाठवून भारत अशा प्रकारची कामगिरी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे.