‘प्रथम’सह इस्रोची ‘अष्टो’झेप
By admin | Published: September 27, 2016 05:29 AM2016-09-27T05:29:07+5:302016-09-27T05:29:07+5:30
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी यशस्वीपणे आठ उपग्रह अवकाशात सोडले. देशाची ही आतापर्यंतची सर्वात जास्त वेळ (दोन तास) चाललेली अवकाश मोहीम होती.
श्रीहरीकोटा (आंध्र प्रदेश) : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी यशस्वीपणे आठ उपग्रह अवकाशात सोडले. देशाची ही आतापर्यंतची सर्वात जास्त वेळ (दोन तास) चाललेली अवकाश मोहीम होती.
येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून सकाळी ९ वाजून १२ मिनिटांनी पीएसएलव्ही सी-३५ने उड्डाण केले. सगळ््या आठ उपग्रहांना वेगवेगळ््या कक्षांमध्ये सोडण्याचे अभूतपूर्व काम पीएसएलव्ही सी-३५ ने केले. त्यासाठी सव्वादोन तास लागले. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे, यातील एक उपग्रह आयआयटी, मुंबईच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. भारताचे स्कॅटसॅट-१ आणि इतर देशांच्या पाच उपग्रहांना पीएसएलव्ही प्रक्षेपण यानाने अवकाशात यशस्वीपणे सोडले. हे उपग्रह दोन वेगवेगळ््या अंतराळ कक्षेत सोडण्यात आले आणि इस्रोच्या शिरपेचात हे आणखी एक मानाचे पीस खोवले गेले. (वृत्तसंस्था)
स्कॅटसॅट-१ शिवाय कक्षेत सोडलेले दोन उपग्रह हे भारतीय विद्यापीठाचे ‘प्रथम’ आणि ‘पिसॅट’, अल्जेरियाचे तीन-अलसॅट-१ बी, अलसॅट-२ बी आणि अलसॅट-१एन आणि अमेरिका, कॅनडाचे अनुक्रमे पाथफार्इंडर-१ आणि एनएलएस-१९ सोडण्यात आले.
हे यश का महत्त्वाचे?
इस्रोन म्हटले आहे की, स्कॅटसॅट-१ ओशनसॅट-२ ची पुढची सततची मोहीम आहे. स्कॅटसॅट-१ मुळे हवामानाचे, वादळ कुठे आहे व त्याचा मार्ग कोणता, याचे भाकीत करण्यास मदत होईल.
या उपग्रहाचे मोहिमेचे आयुष्य पाच वर्षांचे आहे. इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन करून, स्कॅटसॅटकडून अवघ्या १८० मिनिटांत माहिती उपलब्ध होणार असल्यामुळे हे यश अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
ओशनसॅट-१ आणि ओशनसॅट-२ हे उपग्रह सागरी वाऱ्याची दिशा आणि परिणाम याची माहिती संपूर्ण जगाला देणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.