ISROची मोठी कामगिरी; दिवाळीच्या आदल्या दिवशी लॉन्च होणार सर्वात वजनदार रॉकेट, त्यासोबत...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 03:32 PM2022-10-15T15:32:43+5:302022-10-15T15:33:37+5:30
ISROच्या सर्वात वजनदार रॉकेटमधून ब्रिटेनचे 36 उपग्रह अंतराळात सोडले जाणार आहेत.
Isro Rocket Launching: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) दिवाळीच्या एक दिवस आधी आपले सर्वात वजनदार रॉकेट प्रक्षेपित करणार आहे. ब्रिटीश स्टार्ट अप कंपनी वनवेबचा (OneWeb) उपग्रह याच रॉकेटमधून अंतराळात सोडण्यात येणार आहे. हा उपग्रह अंतराळातून इंटरनेट सुविधा देणार आहे. एअरटेलची भारती एंटरप्राइझ कंपनी, या कंपनीत शेअर होल्डर आहे.
इस्रोच्या या रॉकेटचे नाव लॉन्च व्हेईकल मार्क-3 (LVM3) आहे. याला पूर्वी जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेईकल मार्क-3 (GSLV Mk III) म्हणून ओळखले जात होते. विशेष म्हणजे, या रॉकेटमध्ये वनवेबचे 36 उपग्रह लॉन्च होणार आहेत. या मिशनचे नाव आहे- LVM3-M2/OneWeb India-1 मिशन आहे. रॉकेटचे प्रक्षेपण 23 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7 वाजता श्रीहरिकोटा स्पेसपोर्टवरून होईल. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रॉकेटचा क्रायो स्टेज, इक्विपमेंट बे असेंब्ली पूर्ण झाली आहे. रॉकेटच्या वरच्या भागात उपग्रह ठेवण्यात आले असून, अंतिम परीक्षण सुरू आहे.
इस्रोचा वनवेबशी करार झाला आहे. इस्रो असे दोन प्रक्षेपण करणार आहे. म्हणजेच 23 ऑक्टोबरला लाँच झाल्यानंतर आणखी एक लाँच होणार आहे. पुढील वर्षी जानेवारीमध्ये ते होण्याची शक्यता आहे. हे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत तैनात केले जातील. हे ब्रॉडबँड कम्युनिकेशन उपग्रह आहेत, ज्याचे नाव OneWeb Leo आहे. LVM3 रॉकेटचे हे पहिले व्यावसायिक उड्डाण आहे.
याआधी 2019 मध्ये चांद्रयान-2, 2018 मध्ये GSAT-2, 2017 मध्ये GSAT-1 आणि त्याआधी 2014 मध्ये क्रू मॉड्यूल अॅटमॉस्फेरिक री-एंट्री प्रयोग (CARE) पार पडला. या सर्व मोहिमा देशाच्या होत्या. म्हणजेच त्या सरकारी योजना होत्या. या रॉकेटमध्ये पहिल्यांदाच खासगी कंपनीचा उपग्रह आवकाशातात सोडला जाणार आहे. या रॉकेटद्वारे आतापर्यंत चार प्रक्षेपण करण्यात आले आहेत आणि चारही यशस्वी झाले आहेत.