इस्त्रोसमोर आज मोठे आव्हान! आदित्य एल १ ला हॅलो कक्षेत स्थापन करावे लागणार, थोडीशी चूक...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 07:41 AM2024-01-06T07:41:30+5:302024-01-06T07:41:49+5:30
शनिवारी दुपारी ४ वाजता आदित्य-एल१ला एल१च्या आसपासच्या 'हॅलो' कक्षेत ठेवण्यात येईल.
भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने सुर्याच्या अभ्यासासाठी आपला पहिला सॅटेलाईट सुर्याकडे पाठविला होता. आज हा आदित्य एल१ त्याच्या मुक्कामावप पोहोचणार आहे. एल१ पॉईंटवर स्थापित करण्याचे इस्त्रोसमोर खूप मोठे आव्हान असणार आहे. पृथ्वीपासून हे अंतर तब्बल १५ लाख किमी आहे.
एल१ म्हणजेच लैग्रेंज पॉईंट 1 (एल 1) जवळ हॅलो कक्षेमध्ये आदित्य एल १ आज पोहोचणार आहे. पृथ्वीपासुनचे आदित्यचे हे अंतर सुर्यापासूनच्या पृथ्वीच्या एकूण अंतराच्या केवळ १ टक्का एवढे आहे. या कक्षेतून सुर्याच्या उष्णतेपासून दूर राहत सुर्याच्या हालचालींवर लक्ष ठेवता येते.
शनिवारी दुपारी ४ वाजता आदित्य-एल१ला एल१च्या आसपासच्या 'हॅलो' कक्षेत ठेवण्यात येईल. जर असे केले नाही, तर कदाचित त्याचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरूच राहील. ISRO च्या PSLV-C57 लाँचरने 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) च्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून आदित्य-L1 चे यशस्वी प्रक्षेपण केले होते. यानंतर हे अंतराळयान विविध टप्प्यांतून गेले आणि पृथ्वीच्या प्रभावक्षेत्रातून बाहेर पडून सूर्य-पृथ्वी 'लॅग्रेंज पॉइंट 1' (L1) कडे सरकले.
सौर वातावरणाची गतिशीलता समजून घेण्यासाठी, सूर्याच्या कोरोनाची उष्णता, सौर भूकंप किंवा सूर्याच्या पृष्ठभागावरील 'कोरोनल मास इजेक्शन' (CMEs), सौर वादळांशी संबंधित क्रियाकलाप आणि त्यांची वैशिष्ट्ये आणि पृथ्वीच्या जवळच्या अंतराळातील हवामानविषयक समस्या आदी जाणून घेणे हे या आदित्य एल१ चे उद्दिष्ट आहे.