अंतराळ विज्ञानात इस्रोची गरुडझेप
By admin | Published: February 12, 2017 02:28 PM2017-02-12T14:28:17+5:302017-02-12T14:32:14+5:30
भारत पहिल्यांदाच शुक्र ग्रहावर पोहोचण्याच्या तयारीत असून, लवकरच तो पुन्हा एकदा लाल ग्रह असलेल्या मंगळाची मोहीम फत्ते करण्याच्या तयारीत आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - भारत पहिल्यांदाच शुक्र ग्रहावर पोहोचण्याच्या तयारीत असून, लवकरच तो पुन्हा एकदा लाल ग्रह असलेल्या मंगळाची मोहीम फत्ते करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारकडून पृथ्वीच्या शेजारील ग्रहांवर प्रवेश करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो मोठं प्रक्षेपण करण्याच्या तयारीत आहे. आता इस्रो एकाच वेळी दोन किंवा तीन नव्हे, तर तब्बल 104 सॅटेलाईट लाँच करण्याच्या प्रयत्नात आहे.
जगातल्या कोणत्याच देशानं एकाच वेळी 100हून अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न केला नाही. आजमितीस एकाच वेळी जास्तीत जास्त म्हणजे 37 सॅटेलाईट लाँच करण्याचा विक्रम रशियाने 2014मध्ये केला होता. त्यासाठी त्यांनी आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा वापर केला होता. जर सर्वकाही सुरळीत झाल्यास इस्रो 15 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटामधून पीएसएलव्हीच्या मदतीनं तीन भारतीय आणि 101 छोटे परदेशी उपग्रह अवकाशात पाठवणार आहे. या इस्रोच्या प्रक्षेपणावर अनेक देशांचे लक्ष्य आहे. इस्रोची ही मोहीम यशस्वी झाल्यास इस्रोकडून नवे मापदंड स्थापन होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना अंतराळातील गूढ जाणून घेण्याची फार उत्कंठा असल्याचं जगजाहीर आहे. तसेच यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातही अरुण जेटलींनी अंतराळ संशोधनासाठी 23 टक्के तरतूद केली. अर्थसंकल्पात मंगळ मोहीम 2 आणि शुक्र मोहिमेचा खासकरून उल्लेख करण्यात आला आहे. भारताची दुसरी मंगळ मोहीम 2021-22मध्ये सुरू होणार आहे. मंगळ ग्रहावरील बारीकसारीक हालचाली टिपण्यासाठी एक रोबोटलाही पाठवण्यात येणार आहे. 2013मध्ये सुरुवात झालेलं मिशन पूर्णतः भारतीय होते. इस्त्रो भारताच्या रोमन संस्कृतीत प्रेमाची देवता असलेल्या व्हीनस (शुक्र)वरही स्वारी करण्याची मोहीम आखतो आहे.