इस्रोच्या उपग्रहाचे प्रक्षेपण लांबले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 06:22 AM2020-03-05T06:22:43+5:302020-03-05T06:22:54+5:30
प्रक्षेपणाची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे, असे इस्रोने म्हटले आहे.
बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) जीआयसॅट-१चे गुरूवारी करण्यात येणारे प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे लांबणीवर टाकले आहे. पृथ्वीची बारकाईने टेहळणी करणारा हा उपग्रह श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केला जाणार होता. प्रक्षेपणाची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे, असे इस्रोने म्हटले आहे.
२,२६८ किलो वजनाचा हा अत्याधुनिक उपग्रह जमीन, समुद्र व वातावरणातील परिमाणे यावर सतत लक्ष ठेवणार आहे. तसेच पृथ्वीची छायाचित्रेही पाठवणार आहे.
जीएसएलव्ही-एफ१० या प्रक्षेपकाद्वारे उपग्रह उड्डाण करणार होता. त्याची उंची १६ मजली इमारतीएवढी आहे. तो गुरूवारी सायंकाळी ५.४३ वाजता श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून उड्डाण करणार होता. भारताने यापूर्वी पृथ्वीची टेहळणी करण्यासाठी अनेक उपग्रह पाठवण्यात आले असले तरी हा पृथ्वीच्या नजिकच्या कक्षेतून निरीक्षण नोंदवणार आहे.