ISRO Update : इस्रोची पुन्हा एकदा गगनभरारी, GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 07:52 AM2020-01-17T07:52:07+5:302020-01-17T08:16:38+5:30
ISRO Update : भारतीय अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)नं 17 जानेवारी शुक्रवारी पहाटे 2.35 मिनिटांनी GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
नवी दिल्लीः भारतीय अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)नं 17 जानेवारी शुक्रवारी पहाटे 2.35 मिनिटांनी GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. फ्रान्समधील फ्रेंच गुएनास्थित कोरो द्वीपसमूहातून याचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. उपग्रहाचं प्रक्षेपण झाल्यानंतर काही काळानंतर GSAT-30हून एरियन -5 VA251चा वरचा भाग यशस्वीरीत्या वेगळा झाला. इस्रोचं हे 2020मधलं पहिलं मिशन आहे. हा उपग्रह प्रक्षेपणानंतर 15 वर्षं काम करत राहणार आहे. या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं असून, यात दोन सोलर पॅनल आणि बॅटरी असल्यानं त्यातून ऊर्जा उत्पन्न होणार आहे. इस्रोच्या माहितीनुसार GSAT-30 हा एक संचार उपग्रह आहे. तो इनसॅट-4ए सेटलाइटच्या जागेवर काम करणार आहे. इनसॅट सॅटेलाइट-4चं वय आता पूर्ण होत आलं आहे. त्यातच इंटरनेट टेक्नोलॉजीमध्येही आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे जास्त शक्तिशाली उपग्रहाची गरज आहे. त्यासाठी इस्रोनं GSAT-30चं प्रक्षेपण केलं आहे.
GSAT-30 उपग्रह हा इनसॅट-4एची जागा घेणार आहे. इनसॅट-4एला वर्ष 2005मध्ये लाँच करण्यात आलं होतं. या उपग्रहामुळे भारताची दूरसंचार सेवा आणखी प्रभावी होणार असून, इंटरनेट स्पीडही वाढणार आहे. तसेच ज्या क्षेत्रात मोबाइल सेवा अद्याप पोहोचलेल्या नाहीत, तिकडेही पोहोचणं या उपग्रहामुळे शक्य होणार आहे.Indian Space Research Organisation: India’s telecommunication satellite GSAT-30 was successfully launched into a Geosynchronous Transfer Orbit (GTO) from Kourou launch base in French Guiana by Ariane-5 VA-251, today. (Image Courtesy: Arianespace) pic.twitter.com/PVEfVCPMpK
— ANI (@ANI) January 16, 2020
व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच टेलिव्हिजन सेवा आदी सेवांसाठी या उपग्रहाचा वापर होणार असून, हवामान बदल आणि हवामानाचा अंदाज समजण्यासाठी हा उपग्रह मदतगार ठरणार आहे. यंदाच्या वर्षी भारतातल्या इस्रोकडून एकूण 10 उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. यात आदित्य-एल 1 उपग्रहाचाही समावेश आहे. या उपग्रहाला 2020पर्यंत प्रक्षेपित केलं जाईल. मिशन सूर्याचा अभ्यास करणारा हा पहिला भारतीय उपग्रह ठरणार आहे.