ISRO ची यशस्वी कामगिरी, भारतानं पुन्हा रचला इतिहास; अमेरिका, चीन, रशियानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 11:38 IST2025-01-16T11:38:12+5:302025-01-16T11:38:37+5:30

या मोहिमेच्या यशावरच चंद्रयान-४, गगनयान आणि भारतीय अंतराळ स्थानक यासारख्या मोहिमा अवलंबून होत्या

ISRO's successful performance, India became the 4th country to achieve successful Space Docking. | ISRO ची यशस्वी कामगिरी, भारतानं पुन्हा रचला इतिहास; अमेरिका, चीन, रशियानंतर...

ISRO ची यशस्वी कामगिरी, भारतानं पुन्हा रचला इतिहास; अमेरिका, चीन, रशियानंतर...

नवी दिल्ली - इस्रोने आज भारतीय अंतराळ जगतात आणखी एक ऐतिहासिक पाऊल टाकलं आहे. स्पॅडेक्स (SPADEX) मिशन अंतर्गत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. या प्रयोगाद्वारे दोन भारतीय उपग्रहांमधील यशस्वी डॉकिंग घडून आले असून हा प्रकार भारताच्या अंतराळ क्षेत्रातील संशोधन आणि विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जात आहे.

स्पॅडेक्स (SPADEX) मिशन अंतर्गत, हे तंत्रज्ञान अंतराळात दोन अवकाश यानांना एकमेकांशी जोडण्याचे कार्य करते. यामुळे भविष्यातील मनुष्यबळ असलेल्या अंतराळ मोहिमा, अंतराळातील देखभाल, तसेच यानांच्या इंधन भरावासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) सध्या या क्षेत्रात आघाडीवर असून भविष्यातील अवकाश मोहिमांसाठी हा प्रयोग महत्त्वपूर्ण मानला जात आहे. इस्रोच्या या यशाबद्दल देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पंतप्रधानांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, उपग्रहांच्या स्पेस डॉकिंगच्या  यशस्वी प्रयोगाबद्दल ISRO च्या वैज्ञानिकांचे आणि संपूर्ण अंतराळ क्षेत्रातील सहकाऱ्यांचे अभिनंदन,  भारताच्या आगामी महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे असं त्यांनी सांगितले. 

या मोहिमेच्या यशावरच चंद्रयान-४, गगनयान आणि भारतीय अंतराळ स्थानक यासारख्या मोहिमा अवलंबून होत्या. चंद्रयान-४ मोहिमेत चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जातील. गगनयान मोहिमेत मानवांना अंतराळात पाठवले जाईल. इस्रोने ३० डिसेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट मिशन लाँच केले होते या अंतर्गत, PSLV-C60 रॉकेटद्वारे पृथ्वीपासून ४७० किमी वर दोन अंतराळयान तैनात करण्यात आले. या मोहिमेत दोन्ही अंतराळयान ७ जानेवारी रोजी जोडले जाणार होते, परंतु ते पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर ९ जानेवारी रोजीही तांत्रिक अडचणींमुळे डॉकिंग पुढे ढकलण्यात आले. १२ जानेवारी रोजी अंतराळयानांना एकमेकांपासून ३ मीटर अंतरावर आणण्यात आले आणि नंतर सुरक्षित अंतरावर परत हलवण्यात आले.

 

दरम्यान, डॉकिंग तंत्रज्ञान भारताच्या अंतराळाच्या महत्वाकांक्षांसाठी आहे. चंद्रावर भारतीय मोहिम, चंद्रावरून नमुने परत आणणे, भारतीय अंतराळ स्थानक (BAS) तयार करणे आणि ते चालवणे, या सर्वांसाठी आवश्यक आहे. या मोहिमेमुळे भारत अंतराळ डॉकिंग तंत्रज्ञान असलेला जगातील चौथा देश बनला आहे. आतापर्यंत ही कामगिरी फक्त अमेरिका, चीन आणि रशिया यांनी पूर्ण केलीय. आता यादीत चौथ्या क्रमांकावर भारताचं नाव जोडले आहे. 

Web Title: ISRO's successful performance, India became the 4th country to achieve successful Space Docking.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.