महाकुंभातील चेंगराचेंगरीचा मुद्दा लोकसभेत गाजला, अखिलेश यादव यांनी योगी सरकारला घेरले; राजीनाम्याची मागणी केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:47 IST2025-02-04T13:45:40+5:302025-02-04T13:47:26+5:30
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज लोकसभेत महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित केला.

महाकुंभातील चेंगराचेंगरीचा मुद्दा लोकसभेत गाजला, अखिलेश यादव यांनी योगी सरकारला घेरले; राजीनाम्याची मागणी केली
प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. महाकुंभ दररोज नवीन बातम्या समोर येत आहेत. काही दिवसापूर्वी महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेवरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आज लोकसभेत या मुद्द्यावरुन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रश्न उपस्थित केले. चेंगराचेंगरीच्या मुद्द्यावरुन खासदार यादव यांनी योगी सरकारला घेरले आहे.
महाकुंभातील चेंगराचेंगरी आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची आकडेवारी जाहीर करण्यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी लोकसभेत भाजप सरकारवर हल्लाबोल केला. यादव म्हणाले की, मला वृत्तवाहिनीवरून कळले की महाकुंभात १०० कोटी लोकांच्या आगमनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मग हा अपघात कसा झाला?, असा सवालही त्यांनी केली. जर हे चुकीचे असेल तर मी तुम्हाला माझा राजीनामा देऊ इच्छितो, असंही ते म्हणाले.
खासदार अखिलेश यादव म्हणाले, "सरकार सातत्याने अर्थसंकल्पीय आकडेवारी देत आहे. आकडेवारी देण्यापूर्वी, महाकुंभात मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारीही द्यावी. या घटनेबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
अखिलेश म्हणाले की, महाकुंभ आपत्ती व्यवस्थापन आणि हरवलेले आणि सापडलेले या केंद्राची जबाबदारी लष्कराकडे सोपवावी. महाकुंभ घटनेतील मृतांची आकडेवारी, जखमींवर उपचार, औषधे, डॉक्टर, अन्न, पाणी आणि वाहतुकीच्या उपलब्धतेची आकडेवारी संसदेत मांडली पाहिजे, असंही यादव म्हणाले.
'कठोर कारवाई केली पाहिजे'
महाकुंभ दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली पाहिजे आणि सत्य लपवणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, असंही अखिलेश यादव म्हणाले. जर चूक नव्हती तर आकडे का दाबले, लपवले का?, असा सवालही त्यांनी केला.
अखिलेश यादव म्हणाले, या घटनेत काही जणांचा मृत्यू झाला आहे, याची माहिती मिळाली, मृतदेह शवागारात आणि रुग्णालयात पडले आहेत, तेव्हा सरकारने त्यांचे हेलिकॉप्टर फुलांनी भरले आणि त्यांच्यावर फुले वर्षाव केली. ही कसली सनातनी परंपरा आहे? देवालाच माहिती." "किती लोकांचा मृत्यू झाला आहे?" चप्पल, कपडे आणि साड्या आजूबाजूला पडल्या होत्या आणि त्या सर्व जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर ट्रॉलींनी उचलल्या होत्या. त्या कुठे फेकल्या हे कोणालाही माहिती नाही. सर्व काही लपविण्यासाठी, असे ऐकू येत आहे की काही दबाव जेणेकरून त्यांच्या बातम्या बाहेर येऊ नयेत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.