"पूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री खोकत होते; आता सर्व दिल्लीकर खोकत आहेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 06:11 PM2019-11-19T18:11:30+5:302019-11-19T18:30:50+5:30

दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवर लोकसभेत आज चर्चा झाली.

The issue of pollution in Delhi was discussed in the Lok Sabha today. | "पूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री खोकत होते; आता सर्व दिल्लीकर खोकत आहेत"

"पूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री खोकत होते; आता सर्व दिल्लीकर खोकत आहेत"

Next

नवी दिल्ली:  दिल्लीतील प्रदूषणात वाढ होत असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. प्रदूषणात वाढ झाल्याने श्वास घेणं ही लोकांसाठी कठीण झालं आहे. वायू गुणवत्ता खराब श्रेणींमध्ये आली असून येत्या काही दिवसांत ती आणखी खालावण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवर लोकसभेत आज चर्चा झाली. यामध्ये पूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री खोकत होते, आता दिल्लीतील सर्व लोकं खोकत असल्याचे सांगत भाजपाचे खासदार प्रवेश साहिब सिंह यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.

नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातले दुसरे अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले आहे. लोकसभेत आज दिल्लीच्या प्रदूषणावर चर्चा करण्यात आली. यामध्ये भाजपाने अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. तृणमूल काँग्रेसचे खासदार काकोली घोष यांनी तोंडाला मास्क घालून सभागृहात दाखल झाल्या होत्या. मंत्री आणि खासदारांनी आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्याचे आवाहन देखील काकोली घोष यांनी केले.

दिल्लीमध्ये सोमवारपासून (4 नोव्हेंबर) दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी सम-विषम नियम लागू झाला आहे. दिल्ली सरकारने 4 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत हा वाहतूक नियम लागू केला आहे. मात्र आता या नियमाच्या कालावधीत वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. गरज भासल्यास आणखी काही दिवस सम-विषम नियम लागू करण्यात येणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली आहे. प्रदूषणात वाहनांच्या धुराचा सहभाग असल्याने राज्याला ही समस्या भेडसावत आहे. अशातच शेजारच्या राज्यात शेतकरी पराली जाळत असल्याने प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनांसाठी सम-विषम नियम लागू करून सरकारने काही प्रमाणात प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

दिल्लीच्या वातावरणात  शेजारच्या राज्यांमध्ये पेंड्या जाळल्यामुळे प्रदूषणात 10 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिल्ली व एनसीआर परिसरातील वातावरणात धुक्यासारखा प्रदूषित हवेचा पट्टा निर्माण झाला आहे. तीन महिन्यांनंतर दिल्लीतील हवेच्या प्रदूषणात आणखी वाढ झाली आहे. दिल्लीजवळील राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पराली जाळली जात असल्याने दिल्लीतील हवेची गुणवत्ता बिघडली असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते. पंजाब, हरयाणातील पराली जाळली जात असल्यामुळे दिल्ली-एनसीआरमधील हवेच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा करण्यासाठी 10 सदस्यीय समितीने कृती आराखडा तयार केला आहे. राजधानीतील हवा काही प्रदूषित झाली आहे. प्रदूषित हवेच्या त्रास नागरिकांना बसू नये यासाठी दिल्लीकरांना मास्क वाटण्यात आले आहेत.

दिल्लीत हवाच नव्हे, पिण्याचे पाणीही अशुद्ध

इतर शहरांच्या तुलनेत दिल्लीतील पाणी खराब असल्याचे दिसून आले. यावेळी रामविलास पासवान म्हणाले,"आम्ही कोणत्याही सरकारला दोष  देत नाही. या विषयावरून आम्ही राजकारण करत नाही. तर आमचे उद्दिष्ट लोकांपर्यंत स्वच्छ पाणी पोहोचले पाहिजे. त्यामुळे दिल्ली सरकारने समजून घेतले पाहिजे." देशातील शहरांमध्ये पाणी गुणवत्ता चाचणी यापुढे सुद्धा केली जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची तीन टप्प्यांत चाचणी करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात सर्व राजधानींमधील पाण्याची चाचणी करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटींमधील पाण्याची चाचणी करण्यात येईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात सर्व जिल्ह्यांतील पाण्याची चाचणी करण्यात येणार असल्याचे रामविलास पासवान यांनी सांगितले. 

Web Title: The issue of pollution in Delhi was discussed in the Lok Sabha today.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.