न्यायाधीशांच्या आत्मसंयमामुळेच ते टीकेचे लक्ष्य - एन.व्ही. रामणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 01:48 AM2020-09-14T01:48:11+5:302020-09-14T01:48:23+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती आर. भानुमती यांनी लिहिलेल्या ‘ज्युडिशियरी, जजेस अँड अॅडमिनिस्ट्रेशन आॅफ जस्टीस’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात एन.व्ही. रामणा बोलत होते.
नवी दिल्ली : न्यायाधीश आत्मसंयम राखत असल्यामुळे ते टीकेचे लक्ष्य सहजपणे ठरतात आणि मसालेदार गप्पा व चर्चेचा ते बळी ठरत आहेत, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती एन.व्ही. रामणा यांनी व्यक्त केले. ते शनिवारी येथे सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती आर. भानुमती यांनी लिहिलेल्या ‘ज्युडिशियरी, जजेस अँड अॅडमिनिस्ट्रेशन आॅफ जस्टीस’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते.
न्या. रामणा म्हणाले, सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनीसुद्धा सावधगिरीचा इशारा दिला. बोबडे म्हणाले होते की, ‘न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य हे अंमलबजावणीच्या स्वांतत्र्यापुरते मर्यादित नाही; परंतु इतर अनेक दबाब आणि कलुषित मते असतानाही न्यायव्यवस्था स्वातंत्र्य घेते.’
स्वातंत्र्य टिकून राहण्यासाठी न्यायाधीशांना त्यांच्या सामाजिक आयुष्यात तोल सांभाळावा लागतो. ही पूर्ण जबाबदारी न्यायाधीशाने स्वत:वर लादून घेतलेल्या निर्बंधांतून पार पाडायची असते.
न्यायाधीशांना त्यांच्या स्वत:च्या समर्थनासाठी बोलतानाही आत्मसंयम पाळावा लागतो; पण आता त्यांनाच टीका करण्यासाठीचे सहजसाध्य लक्ष्य समजले गेले आहे व हा विषय समाजमाध्यमांचा व तंत्रज्ञानाचा फारच विस्तार झाल्यामुळे आणखी गुंतागुंतीचा बनला आहे, असे रामणा म्हणाले.
रामणा म्हणाले, ‘समाजमाध्यमांतून चालणाऱ्या मसालेदार गप्पा व बदनामीकारक सोशल मीडिया पोस्टस्चे न्यायाधीश हे त्यामुळेच बळी ठरत आहेत. माझा स्वत:चा अनुभव असा आहे की, न्यायाधीशाचे आयुष्य हे गुलाबफुलाच्या पाकळ्यांचा पलंग नाही. आजच्या काळातील न्यायाधीशाला इतर कोणत्याही व्यवसायात ज्याची बरोबरी होऊ शकणार नाही, अशा त्यागांची गरज आहे व हेच देशाचे भवितव्य कणखर व स्वतंत्र न्यायाधीशांवर उभे राहण्यासाठी आवश्यक आहे.’