डांबरी रस्त्यांत भंगार प्लॅस्टिक वापरणे सक्तीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2015 12:01 AM2015-11-26T00:01:34+5:302015-11-26T00:01:34+5:30
रस्त्यांची गुणवत्ता सुधारावी आणि त्याच बरोबर शहरांमध्ये तयार होणाऱ्या भंगार प्लॅस्टिकच्या विल्हेवाटीस हातभार लागावा
नवी दिल्ली : रस्त्यांची गुणवत्ता सुधारावी आणि त्याच बरोबर शहरांमध्ये तयार होणाऱ्या भंगार प्लॅस्टिकच्या विल्हेवाटीस हातभार लागावा या दुहेरी उद्देशाने केंद्रीय रस्ते मंत्रालयाने यापुढे शहरांमध्ये डांबरी रस्ते बांधताना बिच्युमनसोबत प्लॅस्टिक भंगाराचाही वापर करणे सक्तीचे केले आहे.
केंद्राच्या तसेतच राज्यांच्या योजनांतर्गत पाच लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्येच्या शहरांच्या ५० किमी परिसरात डांबरी रस्ते बांधताना यापुढे भंगार प्लॅस्टिक वापरणे सक्तीचे असेल.
पवडत नाही किंवा प्लॅस्टिकचे भंगार उपलब्ध नाही अशा कारणांवरून प्लॅस्टिक भंगाराचा वापर न करण्यासाठी मंत्रालयाची पूर्वसंमती घ्यावी लागेल, असे निर्देश रस्ते वाहतूक मंत्रालयाने अलीकडेच जारी केले आहेत.
हा नवा निर्णय सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांनाही कळविण्यात आला असून राज्यांनीही आपल्या अखत्यारितील रस्ते बांधताना या धोरणाचे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यानुसार डांबरी रस्ते बांधताना बिच्युमनसोूत भंगार प्लॅस्टिक किती प्रमाणात वापरावे, हे यात म्हटलेले नाही. मात्र रस्त्यांविषयीचे धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या इंडियन रोड काँग्रेस या सर्वोच्च प्रातिनिधिक संस्थेने रस्त्यांच्या बांधकामात भंगार प्लॅस्टिकचा वापर कसा करावा याची मार्गदर्शिका दोन वर्षांपूर्वी जारी केली आहे, असे नमूद करून त्याचे पालन करावे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)