अभियंता जोडप्याने उभी केली दूध डेअरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 12:39 AM2020-10-05T00:39:12+5:302020-10-05T00:39:23+5:30
आयटी कंपनीत काम केलेले दाम्पत्य रमले गाय-वासरांमध्ये
चेन्नई : चेन्नईतील प्रसिद्ध माहिती व तंत्रज्ञान (आयटी) कंपनीत काम केलेल्या प्रिथा आणि मणिकंदन या अभियंता जोडप्याला २०१७ मध्ये जल्लीकट्टू निषेध आंदोलनात गायीचे देशी वाण जतन करून ठेवण्याची आवड निर्माण झाली व नंतर त्यांनी त्यांच्या गॅरेजमध्ये डेअरीच उभी केली.
या जोडप्याने सांगितले, ‘‘खरे तर आमची गायी पाळण्याची अशी कोणतीच योजना नव्हती. ते असेच घडत गेले. आम्हा दोघांनाही शेतीत आवड असली तरी आमची माहिती ही अगदीच प्राथमिक स्वरूपातली. निषेध आंदोलनात आम्हाला देशी गायीच्या वाणाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. त्यासाठी आम्ही गायीची देशी जात ‘कंगेयाम कल्लाई’ पाहण्यासाठी इरोडला प्रवास केला. दुसरा कोणताही विचार न करता आम्ही ती गाय तेथेच विकत घेतली. अदामबक्कम येथील आमच्या घरी फार मोकळी जागा नसल्यामुळे ती गाय गॅरेजमध्ये बांधली.
...हा आनंददायी अनुभव
प्रिथा यांनी सांगितले की, ‘‘आम्ही आमच्या नोकरीच्या कामातून थोडा वेळ काढून गौशाळांना भेटी दिल्या व जी कामे आम्ही कधी केली नाहीत ती केली. तो आनंददायी अनुभव होता. गायींचे पालन करणे हे खरोखर काही फार कठीण काम नाही. कुत्रा किंवा मांजर आपण पाळतो तसेच गाय पाळता येईल हे आमच्या लक्षात आले.’’ नंतर या जोडप्याने आणखी गायी विकत घेतल्या. दुधाचे पदार्थ कसे करायचे, शेण आणि गोमूत्र कसे विकायचे या गोष्टी शिकून घेतल्या व यातून त्यांच्याच गॅरेजमध्ये डेअरी उभी राहिली.