देशात दोन कोटी वाहने भंगारात काढण्याच्या लायकीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:47 AM2018-07-24T01:47:04+5:302018-07-24T01:47:56+5:30
जगभरात दोन अब्ज वाहने असून दरवर्षी त्यातील ४ कोटी वाहनांचे आयुष्यमान संपत असते
नवी दिल्ली : देशात दोन कोटी वाहने भंगारात काढण्याच्या लायकीची झाली आहेत असे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हॉयरमेंट (सीएसइ) या संस्थेने आपल्या नव्या अहवालात म्हटले आहे.
जगभरात दोन अब्ज वाहने असून दरवर्षी त्यातील ४ कोटी वाहनांचे आयुष्यमान संपत असते. वाहनांचे उत्पादन करणाऱ्या भारतासह काही विकसित देशांमध्ये आयुष्यमान संपलेल्या वाहनांची मोठी संख्या आहे. मात्र ती वाहने भंगारात काढण्यासाठी जितकी यंत्रसामुग्री लागते ती या देशांकडे उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असेही या अहवालात म्हटले आहे.
सीएसइच्या कार्यकारी संचालक अनुमिता रॉय यांनी सांगितले की, आयुष्यमान संपलेली वाहने भंगारात काढण्याविषयी केंद्र सरकार एक धोरण आखत असले तरी वाहनांच्या आयुष्याबाबत कायदा करण्याची गरज आहे.
आफ्रिकेत जुनाट गाड्यांची आयात
मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणारे कोणतेही वाहन वा विदेशी बनावटीच्या जुन्या गाड्या भारतात आयात करण्यास परवानगी नाही. आफ्रिका खंडातील देशांमध्ये आयात करण्यात येणाºया गाड्यांमध्ये ८० ते ९० टक्के गाड्या जुनाट व मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणाºया असतात.