‘मोदी पुन्हा पंतप्रधान होणे अवघड’; यशवंत सिन्हा यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 05:35 AM2018-10-16T05:35:55+5:302018-10-16T05:36:23+5:30
- विकास झाडे नवी दिल्ली : आता मोदी लाट जराही नाही. विरोधकांनी एकजुटीने मुद्दे दमदारपणे लावून धरायला पाहिजेत. दुर्दैवाने तसे ...
- विकास झाडे
नवी दिल्ली : आता मोदी लाट जराही नाही. विरोधकांनी एकजुटीने मुद्दे दमदारपणे लावून धरायला पाहिजेत. दुर्दैवाने तसे होत नाही. विरोधकांनी महाआघाडीचे सोंग करण्यापेक्षा प्रादेशिक पक्षांनी स्वबळावर लढावे. त्यातून केवळ चार राज्यांतच भाजपच्या लोकसभेच्या १०० जागा कमी होणार आहेत, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी लोकमतकडे व्यक्त केले.
मोदी मीडियाने राहुल गांधी यांना मोदींच्या विरोधात उभे केले. ते कमकुवत असल्याची प्रतिमाही निर्माण केली. मात्र, सध्या देशात ‘मोदी’ लाट ओसरली आहे. त्यामुळे विरोधकांनी तुटून पडायला पाहिजे. सरकारला जाब विचारायला पाहिजे. २०१४ मध्ये मतदार जसे मोदींच्या आश्वासनांना भाळले होते तशी आताची स्थिती नाही. त्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असे वाटत नाही, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले.
सिन्हा म्हणाले की, उत्तर प्रदेशात (८०), बिहार (४०), झारखंड (१४) आणि महाराष्ट्रात (४८) असे एकूण १८२ लोकसभा मतदारसंघ आहेत. मी या राज्यांमध्ये फिरतो आहे. या राज्यांमध्ये भाजपच्या १०० जागा कमी होणार आहेत. बिहारमध्ये लालूजींना विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागात भाजप-सेनेबाबत खूप रोष आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात महाराष्ट्रातील सरकारला अपयश आले आहे. मी स्वत: राज्यात खूप ठिकाणी सभा घेतल्या. त्यातून असे दिसते की, भाजपला चांगलाच फटका बसणार आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांतही भाजप मागे पडतो आहे. पं. बंगालमध्ये भाजपला प्रवेश नाही. कर्नाटकात भाजप मागे आहे.
सत्तेत नसतील तर त्यांचा काळ अवघड
मोदी-शहा या दोघांसाठीही नंतरचा काळ फार अवघड ठरणार आहे. पुढचे भाकीत मी करण्यापेक्षा काय होते, ते देशातील जनता प्रत्यक्षात पाहीलच, असा टोलाही सिन्हा यांनी लगावला.
एम.जे. अकबर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा
‘मी टू’मागे राजकारण असल्याचे नाकारता येत नाही. हा विषय महिलांशी संबंधित आहे. त्यामुळे सरकारला दखल घ्यावी लागणार आहे. एम.जे. अकबर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन चौकशीस सामोरे जावे, असेही सिन्हा म्हणाले.