शाळांच्या भेटीदरम्यान केजरीवाल आल्यास हरकत नाही; अमेरिकेचं अप्रत्यक्ष आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 10:33 PM2020-02-23T22:33:17+5:302020-02-23T22:50:13+5:30
मेलानिया ट्रम्प यांच्यासह केजरीवाल आणि सिसोदिया शाळेच्या दौर्यावर गेल्यास काहीच हरकत नाही, त्या घटनेकडे राजकीयदृष्ट्या पाहू नये, असंसुद्धा अमेरिकेच्या दूतावासानं सांगितलं आहे.
नवी दिल्ली: अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया दिल्लीतल्या सरकारी शाळा पाहण्यासाठी गेल्यास कोणतीही हरकत नसल्याचं अमेरिकेच्या दूतावासाने स्पष्ट केलं आहे. मेलानिया ट्रम्प यांच्यासह केजरीवाल आणि सिसोदिया शाळेच्या दौर्यावर गेल्यास काहीच हरकत नाही, त्या घटनेकडे राजकीयदृष्ट्या पाहू नये, असंसुद्धा अमेरिकेच्या दूतावासानं सांगितलं आहे.
आम आदमी पार्टीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प दिल्लीतल्या शासकीय शाळा पाहायला जाणार आहेत. त्यावेळी तिथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया उपस्थित नसतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया 'आनंदी अभ्यासक्रम' पाहण्यासाठी दिल्लीतल्या सरकारी शाळेत जाऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
रविवारी अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीवर अमेरिकन दूतावासाला काहीच हरकत नव्हती, मेलानिया ट्रम्प यांचा हा राजकीय कार्यक्रम नाही. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळतंय हे पाहण्यासाठी त्या जात आहेत." परंतु केजरीवाल आणि सिसोदिया अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्यासह दिल्लीतल्या सरकारी शाळा पाहण्यासाठी जाणार असल्यानं भाजपाला पोटशूळ उठला आहे. त्यामुळे भाजपा आणि आपमध्ये कुरघोडी सुरू झाली आहे.