कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना मदत करणे हे तर केंद्र सरकारचे कर्तव्यच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 09:50 AM2021-07-01T09:50:30+5:302021-07-01T09:50:57+5:30

सुप्रीम कोर्ट; भरपाईबाबत सहा आठवड्यांत मार्गदर्शक तत्वे तयार करा

It is the duty of the central government to help the families of the Corona victims | कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना मदत करणे हे तर केंद्र सरकारचे कर्तव्यच

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना मदत करणे हे तर केंद्र सरकारचे कर्तव्यच

Next
ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाचे न्या. अशोक भूषण व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठासमोर भरपाईबाबतच्या याचिकांची सुनावणी झाली

नवी दिल्ली : कोरोनाने मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यांना भरपाई देण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारने सहा आठवड्यांच्या आत तयार करावीत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

न्यायालयाने सांगितले की, रुग्णांच्या वारसदारांना किमान किती भरपाई द्यावी याची रक्कम आम्ही निश्चित करणार नाही. ते काम सरकारने करायचे आहे. आपत्तीत लोकांना मदत देणे हे सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे असलेले कर्तव्य या संस्थेने पार पाडल्याचे दिसत नाही असेही न्यायालयाने सुनावले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अशोक भूषण व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठासमोर भरपाईबाबतच्या याचिकांची सुनावणी झाली. कोरोनामुळे किंवा कोरानातून बरे झाल्यानंतरही उद्भवलेल्या इतर विकारांमुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये भरपाई द्यावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारांना द्यावा अशी विनंती याबाबतच्या याचिकांमध्ये करण्यात आली होती. मात्र अशी भरपाई दिल्यास सरकारी तिजोरीवर मोठा ताण येईल. त्यामुळे असा निर्णय घेणे शक्य होणार नाही असे केंद्र सरकारने न्यायालयाला याआधीच सांगितले होते. 

आपत्तीचे नियम लागू करण्याची मागणी
n कोरोना साथीला राष्ट्रीय आपत्तीबाबतचे सर्व नियम लागू करावेत व त्याप्रमाणे कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी अशी मागणी काही संस्थांनी केंद्राकडे केली होती. 
n पण त्यावर केंद्र सरकारने फारसा प्रतिसाद न दिल्याने या संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

पैसा अपुरा पडण्याची भीती  

n केंद्राने म्हटले आहे की, कोरोना बळींच्या वारसदारांना भरपाई दिल्यास कोरोना उपचारांसाठी व इतर अत्यावश्यक गोष्टींच्या खरेदीकरिता पैसा अपुरा पडेल. 
n आमच्याकडे असलेल्या संसाधनांना काही मर्यादा आहेत. धोरणात्मक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये अशी विनंती केंद्र सरकारने न्यायालयाला केली होती. 

यूएईमध्ये स्पुतनिक व्ही ९७% परिणामकारक
संयुक्त अरब अमिरातीत स्पुतनिक व्ही लस संसर्गावर ९७.८ टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्याचा दावा रशियन संस्थेने केला आहे. 

मागील ८७ दिवसांत सर्वात कमी मृत्यूंची नोंद 

गेल्या चोवीस तासांमध्ये देशात कोरोनामुळे ८१७ जण मरण पावले असून हा मागील ८७ दिवसांतला सर्वात कमी आकडा आहे. तसेच ४५ हजारांहून जास्त नवे रुग्ण सापडले असून ६० हजार लोक बरे झाले. सलग ४८व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाºयांचे प्रमाण जास्त होते.

Web Title: It is the duty of the central government to help the families of the Corona victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.