ठरलं... अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 09:38 AM2023-09-27T09:38:49+5:302023-09-27T09:44:30+5:30
रामनवमीला सूर्यकिरणे मूर्तीवर पडतील : नृपेंद्र मिश्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिराच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करत मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पुढील वर्षी २२ जानेवारीला होणार आहे; तर, २० ते २४ जानेवारीदरम्यान कोणत्याही दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी या संबंधित कार्यक्रमात सहभागी होतील.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मिश्रा यांनी सांगितले की, दरवर्षी रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता सूर्याची किरणे श्रीरामांच्या मूर्तीवर पडावीत, अशी व्यवस्था मंदिरात केली जात आहे. त्यांनी सांगितले की, गर्भगृहात दोन मूर्ती असतील. एक चल आणि एक अचल. एक श्रीरामांची बाल्यावस्थेतील आणि दुसरी रामलल्लाची. बाल्यावस्थेतील मूर्तीत भगवान श्रीराम चार अथवा पाच वर्षांचे असतील. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात दहा हजार विशेष निमंत्रित असतील. ज्यात साधू-संत आणि देश-विदेशांतील प्रतिष्ठित लोकांचा समावेश असेल.
मंदिर उभारणीवर आजवर झाला ९०० कोटींहून अधिक खर्च
नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, मंदिर उभारणीवर आतापर्यंत ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झालेला आहे व संपूर्ण मंदिर तसेच परिसरावर सुमारे १,७०० ते १,८०० कोटी रुपयांचा खर्च होईल, असा अंदाज आहे.
सूर्यकिरणांसाठी संगणकीकृत कार्यक्रम
n राममंदिराचे वैशिष्ट्य सांगताना ते म्हणाले की, रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता प्रभू श्रीरामांच्या डोक्यावर सूर्यकिरणे पडावीत, अशी योजना आहे. परंतु मूर्ती ज्या दिशेला आहे, तेथे सूर्याची किरणे थेट पडत नाहीत. यासाठी सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, रुरकी व पुण्यातील एका ॲस्ट्रोनॉमिकल संस्थेने मिळून संगणकीकृत कार्यक्रम तयार केला.
n यात एक छोटेसे उपकरण मंदिराच्या शिखरात लावण्यात येणार आहे. त्याच्या माध्यमातून किरणे येतील व पुन्हा परावर्तित होऊन प्रभू श्रीरामांच्या ललाटावर पोहोचतील. बंगळुरूमध्ये हे उपकरण तयार होत आहे. रामनवमीच्या दिवशी काही सेकंदांसाठी हे होईल. त्यामुळे त्या दिवशी तेथे जास्त संख्येने लोक पोहोचू नयेत, असा प्रयत्न असणार आहे.
n हे एक आव्हान आहे. त्यावेळी कोणत्याही अप्रिय घटना होऊ नये, यासाठी स्क्रीनवर, दूरदर्शनवर दाखवले जावे, असाही प्रयत्न आहे. २२ जानेवारीचा कार्यक्रमही सर्व भाविकांनी आपापल्या गावी पाहावा.