अलर्ट! 'यास' चक्रीवादळ तौत्के, अम्फान वादळाइतकंच विध्वंसक असणार; हवामान विभागाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 17:56 IST2021-05-23T17:56:18+5:302021-05-23T17:56:25+5:30
भारताच्या पश्चिम किनारपट्टीला नुकतंच तौत्के चक्रीवादळाचा फटका बसला. या वादळानं हाहाकार केल्याची घटना ताजी असतानाच आता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर 'यास' नावाचं चक्रीवादळ येऊन धडकणार आहे.

अलर्ट! 'यास' चक्रीवादळ तौत्के, अम्फान वादळाइतकंच विध्वंसक असणार; हवामान विभागाचा इशारा
भारताच्या पश्चिम किनारपट्टीला नुकतंच तौत्के चक्रीवादळाचा फटका बसला. या वादळानं हाहाकार केल्याची घटना ताजी असतानाच आता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर 'यास' नावाचं चक्रीवादळ येऊन धडकणार आहे. चिंतेची बाब अशी की हे चक्रीवादळ देखील तौत्के आणि याआधीच्या अम्फान चक्रीवादळाइतकंच विध्वंसक असणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागनं दिली आहे. (It is highly damaging wind speed you can compare the damage with last Cyclone Tauktae and Cyclone Amphan IMD)
पश्चिम किनारपट्टीवर महाराष्ट्रासह पाच राज्यांना तौत्के वादळाचा मोठा फटका बसला. यात अनेकांची घरं कोसळली तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झालं आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर 'यास' हे चक्रीवादळ येणार असून ते पुढील १२ तासांत भीषण रूप घेईल, असं हवामन विभागने म्हटलं आहे.
यास चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या किनारपट्टी भागात वादळी वारे वाहणार असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात वाऱ्याचा वेग तब्बल १८५ किमी प्रतितास इतकी असू शकतो, असा अलर्ट हवामान खात्यानं दिला आहे. यास वादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देखील कामाला लागलं असून एनडीआरएफच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. तसेच किनारपट्टी भागातील नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासही सुरुवात झाली आहे.
बंगालच्या उपसागरात पूर्व मध्य भागात कमी दबावाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पुढील १२ तासांत हा दबाव क्षेत्र उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ २४ मेपर्यंत आणखी तीव्र होईल आणि २६ मे रोजी ओडिशाची उत्तर किनारपट्टी आणि पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्याला धडकेल, असा इशारा हवामान विभागाच्या भुवनेश्वर उपकेंद्राच्या उपसंचालकांनी दिला आहे. हे चक्रीवादळ तौक्ते आणि अम्फान चक्रीवादळांइतकेच विध्वंसक असेल, असा इशारा हवामान विभागाचे डीजीएम मृत्युंजय महापात्रा यांनी दिला आहे.